ENG vs SL, World Cup 2023: इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स सध्या अनेक समस्यांशी झुंजताना दिसत आहे. आधी गुडघ्याला दुखापत आणि नंतर बसण्याच्या ठिकाणी दुखापत, यामुळे तो सामन्यांपासून दूर राहिला होत. आता अलीकडेच स्टोक्स सराव करताना इनहेलर म्हणजेच दम्यासाठीचा स्प्रे पंप तो वापरताना दिसत आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विश्वचषकात इंग्लंडचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. गुणतालिकेत इंग्लंड नवव्या स्थानावर असून २९ ऑक्टोबरला त्यांचा भारतासोबत सामना आहे. या काळात इंग्लंड विजयासाठी खूप उत्सुक आहे. दरम्यान, बंगळुरूमध्ये सराव सुरू असताना इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सरावानंतर इनहेलरमधून श्वास घेताना दिसत आहे.
स्टोक्सने त्याचे इनहेलर वापरल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. चाहत्यांच्या मनात असाही प्रश्न आहे की स्टोक्सला दमा आहे का? इंग्लंडच्या आगामी सामन्यांमध्ये स्टोक्सची खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर परतलेल्या स्टोक्सला गेल्या सामन्यात केवळ ५ धावा करता आल्या आणि त्याने गोलंदाजीही केली नाही. मात्र, त्याने जरी इनहेलर वापरले असले तरी बेन स्टोक्सला दमा आहे असे नाही. श्वासोच्छवासाशी संबंधित समस्यांसाठी इनहेलरचा वापर केला जातो. काही खेळाडू जड व्यायामानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून सामान्यतः इनहेलर वापरतात.
बेन स्टोक्सने बंगळुरूमध्ये प्रदीर्घ सराव सत्र केला आहे. येथे त्याने नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षणाचा सरावही केला. याशिवाय, इनहेलर हे स्टिरॉइड्सशिवाय कार्यक्षमता वाढवण्याचे एक सोपे साधन आहे. त्याच वेळी, स्टोक्स दुखापतींनी त्रस्त आहेत, अशा परिस्थितीत तो डॉक्टरांच्या सल्ल्याने इनहेलर देखील वापरू शकतो. मात्र, इनहेलर वापरणार्या खेळाडूंची डोपिंगविरोधी नियमांनुसार कठोर तपासणी केली जाते.
वर्ल्ड कप २०२३मध्ये आत्तापर्यंतच्या दोन्ही संघांच्या सामन्यांबद्दल जर बोलायचे झाले तर, इंग्लंडने चार सामने खेळले आहेत आणि श्रीलंकेनेही चार सामने खेळले आहेत. या कालावधीत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून उर्वरित तीन सामने गमावले आहेत. या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना विजयाची नोंद करण्यासाठी कडवे आव्हान देऊ शकतात. इंग्लंडची आतापर्यंतच्या विश्वचषकात चांगली सुरुवात झालेली नाही, कारण संघाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर श्रीलंकेची अवस्थाही आत्तापर्यंत अशीच होती.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सॅम करन, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार आणि विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षणा, कसून रजिथा, दिलशान मधुशंका.