भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंड संघाला एक चिंता वाढवणारी बातमी मिळाली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्यामुळे स्टोक्स जुलै महिन्यापासून सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर आहे. स्टोक्स भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. शिवाय तो १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दुसरा टप्प्यातही खेळणार नाही.
स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्सने संघात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओशाने थॉमसचा समावेश केला आहे. डेली मेलमधील एका वृत्तानुसार, स्टोक्स पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दुबईला रवाना होणार, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर WWE सुपरस्टार जॉन सिनानं केली पोस्ट
स्टोक्सच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले, की तो सध्या क्रिकेटबद्दल विचार करत नाही. टी-२० वर्ल्डकपसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर आहे. १५ सदस्यीय खेळाडू आणि ३ राखीव खेळाडूंची नावे जाहीर करण्यासाठी इंग्लंडच्या निवड समितीची या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. ९ सप्टेंबरपर्यंत संघाबाबत घोषणा केली जाऊ शकते.
बेन स्टोक्ससाठी गेले एक वर्ष खूप कठीण गेले. स्टोक्सने गेल्या वर्षी आपल्या वडिलांना गमावले. वडिलांच्या आजारपणामुळे गेल्या वर्षीही स्टोक्स बराच काळ क्रिकेट खेळला नव्हता. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या अॅशेस मालिकेचा तो संघाचा भाग असणार का, याचेही उत्तर अजून समोर यायचे आहे.