England Announced Playing XI For IND vs ENG 1st T20I: उद्यापासून म्हणजेच २२ जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण ५ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना कोलकातामध्ये होणार असून त्यासाठी इंग्लंड संघाकडून एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इंग्लंड क्रिकेटने भारताविरूद्ध आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. कोलकात्याची खेळपट्टी लक्षात घेऊन इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे.
इंग्लंड संघाचा नियमित कर्णधार जोस बटलर टी-२० सामन्यात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत नसणार आहे. बटलरच्या जागी फिल सॉल्टकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी आधीच सांगितले होते की कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात बटलर विकेटकीपिंग करणार नाही. प्लेइंग इलेव्हन समोर आल्यानंतर बटलरच्या जागी फिल सॉल्ट यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले.
विकेटकीपिंगशिवाय फिल सॉल्ट बेन डकेटसह इंग्लंड संघाच्या डावाची सुरूवात करणार आहे. तर कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गस ऍटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या रूपाने मजबूत अष्टपैलू खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. तर हॅरी ब्रुक हा इंग्लंड संघाचा नवा उपकर्णधार असणार आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या T20I साठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन:
बेन डकेट, फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड.
इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल