India vs England 2nd Test Match Updates : विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ २५३ धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात गिलच्या शतकामुळे भारताने २५५ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य आहे.
प्रत्युत्तरात इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर १४ षटकानंतर एक गडी गमावून ६७ धावा केल्या आहेत. इंग्लिश संघाला विजयासाठी अद्याप ३३२ धावांची गरज आहे. त्याचवेळी भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. इंग्लंडला एकमेव धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, त्याला अश्विनने यष्टिरक्षक भरतच्या हाती झेलबाद केले. बेनला २८ धावा करता आल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जॅक क्रॉली २९ धावा आणि रेहान अहमद नऊ धावांसह खेळत होते.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या दुसऱ्या डावाने झाली, जेव्हा त्यांनी एकही विकेट न गमावता २८ धावा केल्या. यावेळी यशस्वी जैस्वाल १७ चेंडूत १५ धावा आणि कर्णधार रोहित शर्मा १९ चेंडूत १३ धावांवर खेळत होते. तिसरा दिवस भारतासाठी काही खास नव्हता. कारण त्यांनी तीनही सत्रे न खेळता सर्व १० विकेट्स गमावल्या. या काळात फिरकीपटू टॉम हार्टलीने इंग्लंडकडून सर्वाधिक ३ बळी घेतले, तर भारताकडून शुबमन गिलने शतक झळकावले. त्याने १४७ चेंडूत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली.
हेही वाचा – IND vs ENG : “शुबमन गिलची ही खेळी…”, टीम इंडियाच्या ‘प्रिन्स’चे शतकानंतर सचिन तेंडुलकरने केले कौतुक
दिवसाच्या तिसऱ्या सत्रात टीम इंडियाचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. दोन्ही डावात फलंदाजी केल्यानंतर भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने एक गडी गमावून ६७ धावा केल्या आहेत, त्यानंतर उरलेल्या दोन दिवसात त्यांना विजयासाठी ९ विकेट्सवर ३३२ धावांची गरज आहे.
हेही वाचा – Rachin Ravindra : ‘CSK’साठी आनंदाची बातमी, स्टार फलंदाजाने कसोटीत झळकावले पहिले शतक
३९९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेल्या जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. दोघांची ही बहारदार भागीदारी अश्विनने ११व्या षटकात डकेटची विकेट घेऊन तोडली. डकेटने आक्रमक खेळ करत २७ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या.