संघर्ष, थरार, ईर्षां, जिगर या साऱ्या विशेषणांनी नटलेले नाटय़ पाहण्याची अद्भुत संधी अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या रूपाने क्रिकेटजगताला लाभली आणि साऱ्यांची रविवारची सुट्टी सत्कारणी लागली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या जोडीने इंग्लंडचे घामटे काढले होते, दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या विकेटने इंग्लंडच्या नाकी नऊ आणले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची अखेरची जोडी आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरलेली असताना दुसऱ्या डावातही त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचे वाटत असल्याने ट्रेंट ब्रिजवर इंग्लिश प्रेक्षकांचे चेहरे तणावग्रस्त दिसू लागले होते. पण नाटय़पूर्ण सामन्याचा शेवटही तेवढाच नाटय़पूर्ण झाला आणि ऑस्ट्रेलियावर अवघ्या १४ धावांनी थरारक विजय मिळवत इंग्लंडने सुस्कारा सोडला.
ऑस्ट्रेलियाची ९ बाद २३१ अशी अवस्था असताना त्यांना जिंकण्यासाठी ७९ धावांची गरज होती, त्या वेळी इंग्लंडने जणू सामना खिशात टाकला होता. विजय तोंडाशी आलेला असताना हा घास इंग्लंड लवकरच घेईल, असे वाटत होते. पण यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन (७१) आणि जेम्स पॅटिन्सन (नाबाद २५) यांनी ऑस्ट्रेलियन्स कधीही सहजासहजी हार मानत नसतात, याचा प्रत्यय दाखवून दिला. इंग्लंडच्या तोफखान्याच्या डोळ्याला डोळा भिडवत या दोघांनी कसलीही तमा न बाळगता इंग्लंडच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरवण्याचा प्रयत्न केला. हॅडिनने अर्धशतक लगावल्याने ऑस्ट्रेलियाचे विजयाचे मनसुबे वाढले, तर ११वा फलंदाज पॅटिन्सनने ग्रॅमी स्वानला षटकार खेचल्यावर ऑस्ट्रेलिया कलाटणी देणार हा विश्वास अधिक सक्षम झाला.
उपाहाराप्रसंगी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त २० धावांची गरज होती. पण उपाहारानंतर प्रत्येक धाव वाचवण्यासाठी इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी जिवाचे रान केले. ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या जोडीपुढे हतबल झालेल्या अ‍ॅलिस्टर कुकने अखेर आपला हुकमी एक्का बाहेर काढत जेम्स अँडरसनच्या हाती चेंडू सुपूर्द केला.
यापूर्वी दिवसातले तिन्ही बळी त्यानेच घेतलेले होते. अँडरसनचा एक चेंडू हॅडिनला चकवा देऊन यष्टिरक्षक मॅट प्रायरच्या हातात विसावला आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी पंचांकडे जोरदार दाद मागितली. पंच अलीम दार यांनी नाबाद ठरवल्यावर या निर्णयाविरोधात जायचे कुकने ठरवले. ट्रेंट ब्रिजवरच्या प्रत्येक प्रेक्षकाचे श्वास रोखले होते, कारण या एका निर्णयावर सामन्याचा निकाल लागणार होता. ‘त्या’ चेंडूचे पुन: पुन्हा  प्रक्षेपण होत असताना उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. पण अखेर तिसऱ्या पंचांनी आपला बाद देण्याचा निर्णय दार यांना कळवला आणि त्यांनी तो जाहीर करताच इंग्लंडच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. मैदानामध्ये एकमेकांवर अभिनंदनाचा वर्षांव करत असतानाही त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या या अखेरच्या जोडीला सलाम ठोकला.
हॅडिन आणि पॅटिन्सन यांनी अखेरच्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचत इंग्लंडच्या तोंडचे पाणी पळवले होते. हॅडिनने या वेळी ९ चौकारांच्या जोरावर ७१ धावांची खेळी साकारली, तर पॅटिन्सनने २ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने नाबाद २५ धावांची खेळी साकारत हॅडिनला सुरेख साथ दिली. शनिवारच्या ६ बाद १७४वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही फलंदाजांना अँडरसनने कुककरवी झेलबाद करत तंबूचा रस्ता दाखवला आणि अखेरच्या बळीसह सामन्यात १० बळी मिळवण्याची किमया साधत सामनावीराचा बहुमान पटकावला.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : २१५
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव): २८०
इंग्लंड (दुसरा डाव) : ३७५
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ११०.५ षटकांत सर्व बाद २९६ (ब्रॅड हॅडिन ७१, ख्रिस रॉजर्स ५२; जेम्स अँडरसन ५/७३).
सामनावीर : जेम्स अँडरसन

Story img Loader