England Series Win on New Zealand Test: भारतात येऊन भारतीय संघाविरुद्ध निर्भेळ मालिका विजयाचा अविश्वसनीय विक्रम घडवणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाचं नशीब पालटलं आहे. भारत दौऱ्यानंतर मायदेशी परतलेल्या न्यूझीलंड संघाचा इंग्लंडने धुव्वा उडवला आहे. वेलिंग्टन इथे सुरू असलेली दुसरी कसोटी तब्बल ३२३ धावांनी जिंकत इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
२४ वर्षानंतर पाहुण्या संघाने भारतात निर्भेळ मालिका विजय संपादन केला होता. १२ वर्षानंतर भारताने मायदेशात मालिका गमावली. न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेत कसोटी मालिका गमावून आला होता. पण भारतात येऊन त्यांनी दमदार खेळाच्या बळावर संस्मरणीय विजय साकारला. मायदेशी रवाना होताच न्यूझीलंडच्या संघाच्या कामगिरीत एकदमच घसरण झाली.
पहिली कसोटी गमावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पुनरागमन करेल अशी आशा होती पण तसं काहीच घडलं नाही. इंग्लंडने हॅरी ब्रूकच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर पहिल्या डावात २८० धावांची मजल मारली. झंझावाती फॉर्मात असलेल्या ब्रूकने ११ चौकार आणि ५ षटकारांसह १२३ धावांची वेगवान खेळी केली. ऑली पोपने ६६ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडतर्फे नॅथन स्मिथने ४ तर विल्यम ओ रुकने ३ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा पहिला डाव १२५ धावांतच आटोपला. गस अॅटकिन्सन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी ४ विकेट्स पटकावल्या. न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडने १५५ धावांची मोठी आघाडी मिळवत दुसऱ्या डावात खेळायला सुरुवात केली. मनमुराद फटकेबाजीचा परवाना मिळालेल्या इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ४२७ धावांचा डोंगर उभारला. बेन डकेटने ९२ तर जेकब बेथेलने ९६ धावांची आक्रमक खेळी केली. या पायावर कळस चढवत अनुभवी जो रूटने १०६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. कसोटी कारकीर्दीतलं रूटचं हे ३६वं शतक आहे. हॅरी ब्रूकने दुसऱ्या डावातही ५५ धावा केल्या. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर ५८३ धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं.
हेही वाचा – VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. विकेटकीपर फलंदाज टॉम ब्लंडेलने ११५ धावा करत एकाकी झुंज दिली. त्याने १३ चौकार आणि ५ षटकारांसह या खेळपट्टीवर कसं खेळावं याचा वस्तुपाठ सहकाऱ्यांसमोर सादर केला. नॅथन स्मिथने ४२ धावा करत त्याला साथ दिली. न्यूझीलंडचा डाव २५९ धावांत आटोपला. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्सने ३ तर ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
शतक आणि अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या हॅरी ब्रूकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पाकिस्तान दौऱ्यात अपयश पदरी पडलेल्या इंग्लंड संघावर बॅझबॉल पद्धतीने खेळण्याबद्दल टीका झाली होती. त्या पराभवातून बोध घेत इंग्लंडने न्यूझीलंडमध्ये खणखणीत अशी कामगिरी केली. २००७-०८ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडने न्यूझीलंडमध्ये मालिका विजय साकारला आहे. तिसरी आणि अंतिम कसोटी १४ डिसेंबरपासून हॅमिल्टन इथे सुरू होत आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि प्रमुख गोलंदाज टीम साऊदीची ही अंतिम कसोटी असणार आहे.