वृत्तसंस्था, गेल्सेनकिर्चेन
ज्युड बेलिंगहॅमच्या अलौकिक कौशल्यामुळे रविवारी इंग्लंडला युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखता आले. भरपाई वेळेत बेलिंगहॅम आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेतील पहिल्याच मिनिटाला कर्णधार हॅरी केनने केलेल्या गोलमुळे इंग्लंडने स्लोव्हाकियाचा २-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. इंग्लंडची गाठ आता स्वित्झर्लंडशी पडणार आहे.
इंग्लंडचा खेळ पुन्हा एकदा निराशाजनक झाला. त्यांच्या खेळात विश्वासाचा अभाव होता. स्लोव्हाकियाने सामन्याला धारदार सुरुवात केली. २५व्या मिनिटाला इव्हान श्रांझने स्लोव्हाकियाला आघाडीवर नेले. स्लोव्हाकियाचा हा धोक्याचा इशारा इंग्लंड समजू शकले नाहीत. उत्तरार्धात फिल फोडेनने गोल केला. मात्र, पास स्वीकारण्यापूर्वी तो ‘ऑफ-साइड’ असल्याने पंचांनी गोल अपात्र ठरवला.
इंग्लंडला गोलसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. ९० मिनिटांनंतरचा भरपाई वेळही संपत चालला होता. इंग्लंडच्या चाहत्यांचा धीर सुटत चालला होता. अखेर सामना संपण्यास केवळ ३० सेकंदांचा अवधी असताना थ्रो-इनवर खोलवर आलेला चेंडू बेलिंगहॅमने ‘बायसिकल किक’ मारत गोलजाळीत धाडला आणि इंग्लंडला बरोबरी साधता आली. सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत नेण्यात त्यांना यश आले. दोनच दिवसांपूर्वी २१व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बेलिंगहॅमने आपला वाढदिवस असा अनोखा साजरा केला.
हेही वाचा >>>टीम इंडियाचं विजयी ‘अक्षर’, दुर्लक्षित खेळाडू ते टीम इंडियाला जगज्जेतेपदाची वाट दाखवणारा ‘बापू’
अतिरिक्त वेळेत पहिल्याच मिनिटाला आलेल्या क्रॉसवर केनने हेडर मारून गोल करताना इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. यानंतर स्लोव्हाकियाला गोल करता आला नाही.
बेलिंगहॅमवर बंदीची टांगती तलवार
गोल केल्यानंतर आक्षेपार्ह हातवारे करून आनंद व्यक्त करण्याची बेलिंगहॅमची कृती वादग्रस्त ठरली आहे. युरो स्पर्धेची शिस्तपालन समिती याची चौकशी करत आहे. यात तो दोषी आढळल्यास बेलिंगहॅमवर उपांत्यपूर्व लढतीसाठी बंदी घातली जाऊ शकते.