England World Record in Test Cricket: इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने शानदार विजय मिळवला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्या सामन्यात जबरदस्त विजय मिळवला होता आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. आता उभय संघांमधील दुसरी कसोटी वेलिंग्टन येथे खेळवली जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने कसोटीत ५ लाख धावा पूर्ण करून नवा विश्वविक्रम केला. अशी कामगिरी करणारा हा जगातील पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडने शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या डावात ही कामगिरी केली.
इंग्लंडचा वर्ल्ड रेकॉर्ड
इंग्लंड संघाने कसोटी क्रिकेटमध्ये ५ लाख धावांचा टप्पा गाठत नवा इतिहास लिहिला आहे. इंग्लंडने १०८२ कसोटी सामन्यांमध्ये आणि ७१७ क्रिकेटपटूंच्या साथीने ही कामगिरी आपल्या नावे केली आहे. इंग्लंड कसोटीत सर्वाधिक धावा करणारा संघ आहे. इंग्लंडनंतर कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. कांगारू संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४,२८,७९४ धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये २,७८,७०० धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या फलंदाजांनी आतापर्यंत ८९२ कसोटी शतकं केली आहेत. भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत ५५२ कसोटी शतकं झळकावली आहेत.
सध्या वेलिंग्टनमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सुरू आहे आणि ॲडलेडमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सुरू आहे. यामध्ये दोन्ही कसोटीत केलेल्या धावा जोडल्या जातील.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटीत इंग्लिश संघाने प्रथम फलंदाजी करताना २८० धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात किवी संघ १२५ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने दुसऱ्या डावात ५ विकेट गमावून ३७८ धावा केल्या आहेत. दरम्यान जो रूट त्याच्या ३६व्या शतकाकडे वाटचाल करत आहे.
हेही वाचा – VIDEO: लबुशेनच्या ‘त्या’ कृतीमुळे मोहम्मद सिराज संतापला, थेट चेंडूच मारला फेकून; मैदानात नेमकं काय घडलं?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ॲडलेड कसोटीत भारताचा डाव प्रथम फलंदाजी करताना १८० धावांवर आटोपला. तर यजमान संघाने हेड आणि लबुशेनच्या फलंदाजीच्या जोरावर आघाडी मिळवली आहे. दरम्यान ट्रेव्हिस हेडने कसोटी शतकं झळकावलं असून ऑस्ट्रेलियाने ७५ धावांची आघाडी मिळवली आहे.