पाच कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली. यशस्वी जैस्वालच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर भारताने इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदीजाचा निर्णय घेतला. इंग्लंडने या सामन्यात तीन फिरकीपटूंसह एक वेगवान गोलंदाज अशा समीकरणासह खेळायचं ठरवलं. इंग्लंडने डावखुरा फिरकीपटू टॉम हार्टलेला पदार्पणाची संधी दिली.

बेन डकेट आणि झॅक क्राऊले यांनी ५५ धावांची सलामी देत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने डकेटला पायचीत करत ही जोडी फोडली. डकेटने ३५ धावांची खेळी केली. काही मिनिटातच रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ऑली पोप स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेला क्राऊले अश्विनच्या गोलंदाजीवर सिराजकडे झेल देऊन बाद झाला. सिराजने जमिनीलगत येणारा चेंडू अलगद टिपला. क्राऊलेने २० धावा केल्या. ६०/३ वरुन जो रूट आणि जॉनी बेअरस्टो जोडीने चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अक्षर पटेलच्या अफलातून चेंडूवर बेअरस्टोचा बचाव उघडा पडला. ३७ धावांची खेळी करुन बेअरस्टो तंबूत परतला.

जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप करण्याचा रूटचा प्रयत्न जसप्रीत बुमराहच्या हातात जाऊन विसावला. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर स्वीपचा फटका टाळणाऱ्या रुटला या चेंडूवर मोह आवरला नाही. त्याने २९ धावा केल्या. चांगल्या यष्टीरक्षण कौशल्यांमुळे पसंती मिळालेल्या बेन फोक्सला फलंदाजीत कमाल दाखवता आली नाही. अक्षर पटेलने त्याला पॅव्हेलियमध्ये परतावले. कर्णधार बेन स्टोक्सने रेहान अहमदला साथीला घेत छोटी भागीदारी केली. रेहान बाद झाल्यानंतर पदार्पणवीर टॉम हार्टलेने कर्णधाराला चांगली साथ दिली. या जोडीने आठव्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. जडेजाने हार्टलेला त्रिफळाचीत केलं. मार्क वूडनेही स्टोक्सला साथ दिली. या जोडीने नवव्या विकेटसाठी ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भागीदारीदरम्यान स्टोक्सने अर्धशतक पूर्ण केलं. जसप्रीत बुमराहने स्टोक्सला त्रिफळाचीत करत इंग्लंडचा डाव २४६ धावांवर संपुष्टात आणला. स्टोक्सने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावांची खेळी केली.

भारताकडून रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या. बुमराह आणि पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात केली. इंग्लंडच्या फिरकीपटूंचा समाचार घेत यशस्वीने चौकार, षटकारांची लयलूट केली. यशस्वीच्या तडाखेबंद फलंदाजीमुळेच भारताने दिवसअखेर ११९/१ अशी मजल मारली. कर्णधार रोहित शर्माला जॅक लिचने बाद केलं. त्याने २४ धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी ७६ तर शुबमन गिल १४ धावांवर खेळत आहेत. भारतीय संघ अजूनही १२७ धावांनी पिछाडीवर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England bundled out for 246 in hyderabad test yashasvi starts with a bang psp
Show comments