अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडसमोर पुनरागमनाचे लक्ष्य आहे. बुधवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला एजबॅस्टन येथे सुरुवात होत आहे. कार्डिफमधील पराभवाची ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्समध्ये सव्याजासह परतफेड करून मालिका १-१ अशी बरोबरीवर आणली. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक आणि प्रशिक्षक ट्रेव्हर बायलिस यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाला डोके वर काढू न देण्याचे आव्हान आहे.
‘‘लॉर्ड्सवरील पराभवानंतरही इंग्लंड या कसोटीत दमदार कामगिरी करील आणि लॉर्ड्स कसोटीचा खलनायक मिचेल जॉन्सन याचा वेगवान मारा सहज थोपवील,’’ असा विश्वास जो रूटने व्यक्त केला आहे. २०१३-१४च्या अॅशेस मालिकेत जॉन्सनने ३७ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच जोरावर ऑस्ट्रेलियाने ५-० अशी मालिकाही जिंकली होती. कार्डिफमध्ये हरवलेल्या जॉन्सनला लॉर्ड्स कसोटीत पुन्हा लय सापडल्याचे समोर आले आहे. कार्डिफ कसोटीत इंग्लंडच्या प्रेक्षकांकडूनही जॉन्सनची थट्टा उडवण्यात आली, परंतु त्याने लॉर्ड्सवर उत्तम कामगिरी करून त्या थट्टेला उत्तर दिले. त्यामुळे एजबॅस्टन कसोटीत बाजी मारून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी दंड थोपटले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कच्या तुलनेत कुक चांगल्या लयीत आहे, परंतु रणनीती आखण्यात क्लार्क वरचढ ठरतोय. लॉर्ड्सवर जॉन्सनने तीन महत्त्वाचे बळी टिपून इंग्लंडचा दुसरा डाव १०३ धावांत गुंडाळला होता. त्यामुळे या कसोटीतही जॉन्सन प्रहार करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कसोटीत इंग्लंड गॅरी बॅलन्स याला वगळून जॉनी बेअरस्टो याला संधी देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इयान बेल याला तिसऱ्या स्थानावर बढती देऊन त्यापाठोपाठ रूट व बेअरस्टो हे फलंदाजीला येतील. लॉर्ड्सवर दिलासादायक कामगिरी करणाऱ्या मार्क वूड याची दुखापत इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरू शकते, अशा परिस्थितीत स्टीव्हन फिन किंवा आदिल रशीद यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पीटर नेव्हिलने पदार्पणातच चांगली कामगिरी केल्याने ब्रॅड हॅडीनऐवजी त्यालाच प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसऱ्या कसोटीत अप्रतिम फलंदाजी करणारा ख्रिस रॉजर्स संघात कायम राहणार आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील विजयी संघासह ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर
वेळ : दुपारी ३.३० पासून
कार्डिफ कसोटीनंतर निराशाजनक कामगिरी केल्याची खंत वाटते. ते चार दिवस अवघड होते. मात्र, ते दिवस संपले आणि घरच्या प्रेक्षकांसमोर पुनरागमन करण्यासाठी आम्ही तयार आहोत.
– अॅलिस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार
ज्या पद्धतीने आम्ही लॉर्ड्सवर २० बळी टिपण्यात यश मिळवले, तीच कामगिरी येथे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
संभाव्य प्रतिस्पर्धी संघ
इंग्लंड -अॅलिस्टर कुक (कर्णधार), अॅडम लिथ, इयान बेल, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वूड, जेम्स अँडरसन
ऑस्ट्रेलिया- डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, स्टीव्हन स्मिथ, मायकेल क्लार्क (कर्णधार), अॅडम व्होग्स, मिचेल मार्श, पीटर नेव्हिल (यष्टीरक्षक), मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड, नॅथन लिऑन