सध्या इंग्लंडमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ट्स क्रिकेट मैदानावर काल (२ जून) सुरू झाला. हा सामना जरी न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यान असला तरी या सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या कामय आठवणीमध्ये राहिल. सामन्याच्या पहिल्या दिवशी दिवंगत दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) मोठा निर्णय घेत ऐतिहासिक क्रिकेट मैदान लॉर्ड्सच्या समालोचन कक्षाचे नाव बदलले आहे. लॉर्ड्समधील समालोचन कक्षाला पूर्वी ‘स्काय समालोचन कक्ष’ असे म्हटले जात होते. पण, कालपासून आता हा कक्ष शेन वॉर्नच्या नावाने ओळखला जाईल. शिवाय कक्षाच्या भिंतींवर शेन वॉर्नची कायमस्वरूपी राहतील अशी छायाचित्रेही लावण्यात आली आहेत.

याआधी इंग्लंड क्रिकेट मंडळाने पॅव्हेलियनमधून मैदानावर जाणाऱ्या खेळाडूंच्या ‘आयकॉनिक वॉकचा’ एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या डावाची २३ षटके संपल्यानंतर सामना २३ सेकंदांसाठी थांबवण्यात आला. स्क्रीनवर शेन वॉर्नची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.

शेन वॉर्न २३ क्रमांकाची जर्सी घालत असे त्यामुळे सामना २३ षटकांनंतर थांबवण्यात आला आणि २३ सेकंद टाळ्यांचा कडकडाट झाला. यावर्षी ४ मार्च रोजी थायलंडमध्ये शेन वॉर्नचे आकस्मिक निधन झाले. महान डावखुरा गोलंदाज असलेल्या वॉर्नच्या नावावर ७०८ कसोटी बळी आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २९३ बळी घेतलेले आहेत.

Story img Loader