भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मंगळवारी (१२ जुलै) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. भारताची फलंदाजी सुरू असताना मैदानावर एक क्षण असा आला की, स्वत: रोहित शर्मादेखील काळजीत पडला होता. त्याने मारलेल्या एका पुल शॉटमुळे प्रेक्षकांमध्ये बसलेली एका चिमुकली जखमी झाली होती. सामना संपल्यानंतर रोहितने त्या मुलीची भेट घेऊन तिला चॉकलेट दिले होते. आता या मुलीला इंग्लंडच्या संघानेही एक खास गिफ्ट दिले आहे.
भारताची फलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात रोहित शर्माने डेव्हिड विलीचा चेंडू फाइन लेगच्या दिशेने उडवला. हा चेंडू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका छोट्या क्रिकेट चाहतीला लागला. पंचांनी षटकाराचा इशारा दिल्यानंतर कॅमेरामनने पुन्हा कॅमेरा स्टँडकडे वळवला. तेव्हा एक व्यक्ती मुलीला आपल्या हातांवर घेऊन उभा राहिल्याचे दिसले. ही मुलगी रोहितने मारलेल्या चेंडूमुळे जखमी झाल्याचे समजताच मैदानाच्याकडेला उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या फिजिओने लगेचच तिच्याकडे धाव घेतली होती.
इंग्लंड संघाच्या फिजिओंनी दाखवलेल्या तत्परतेचे सोशल मीडियावर कौतुक झाले होते. आता एका सोशल मीडिया पोस्टमध्ये या मुलीच्या नावाचा खुलासा झाला आहे. या सहा वर्षीय मुलीचे नाव मीरा साळवी असल्याचे सांगितले जात आहे. क्रिकेटच्या या चिमुकल्या चाहतीसाठी इंग्लंड संघाने आपली जर्सी भेट दिली आहे. इंग्लंडच्या जर्सीसह मीराचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत.