James Vince: इंग्लंडचा क्रिकेटपटू आणि हॅम्पशायरचा कर्णधार जेम्स व्हिन्सने त्याच्या घरावर झालेल्या हल्ल्यांबद्दलची धक्कादायक माहिती सांगितली आहे. ज्यामुळे त्याच्या कुटुंबाला साउथॅम्प्टनमधील त्याचे मूळ गाव सोडावे लागले. विन्स आणि त्याच्या कुटुंबाने साउथॅम्प्टनच्या पूर्वेला असलेल्या एका गावात जवळपास आठ वर्षे वास्तव्य केले आहे. पण मंगळवार, १६ जुलै रोजी द टेलिग्राफला दिलेल्या वृत्तात, विन्सने उघड केले की गेल्या तीन महिन्यांत हॅम्पशायरमधील त्याच्या घरावर दोनदा हल्ले झाले आहेत. विन्स या घरात त्याची पत्नी आणि सात आणि तीन वर्षांच्या दोन मुलांसह राहतो.
तीन महिन्यांपूर्वी, अचानक मध्यरात्री काचा फुटल्याच्या आणि अलार्म वाजल्याच्या आवाजाने विन्स आणि त्याचे कुटुंबिय उठले. त्यांच्या घरावर आणि गाड्यांवर हल्ला करण्यात येत होता. अवघ्या एक महिन्यानंतर, सर्व दुरूस्त केल्यानंतर त्यांच्या घरावर आणि गाड्यांवर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. दुसरा हल्ला नव्याने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ज्याचा व्हीडिओही पाहायला मिळत आहे.
James Vince च्या घरावरील हल्ल्याचे CCTV फुटेज
विन्सच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या फुटेजमध्ये दोन माणसं आहेत, एकाने स्वेटर घातलेलं आहे, त्याच्या मागे जिम किंग या ब्रँडचा लोगो आहे. हा माणूस टॉर्च धरून असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडून विटा घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एकाही व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. या हल्ल्यांनंतर, हॅम्पशायर, ईसीबी आणि व्यावसायिक क्रिकेटर्स असोसिएशनकडून विन्सला पाठिंबा देण्यात आला. विन्सच्या घरावरील झालेल्या हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी गुप्तचर संस्था नियुक्त करण्यात आल्या होत्या, परंतु त्यांच्या चौकशीत आतापर्यंत फारशी माहिती मिळाली नाही.
हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकरने धोनीचे नाव कर्णधारपदासाठी सुचवण्यामागचं सांगितलं खरं कारण: म्हणाला, “त्यावेळेस माझी…”
विन्सच्या मालमत्तेची दोन वेगवेगळ्या वेळी (एप्रिल १५ आणि जुलै १६) तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाला घर सोडावे गेले. दुसरा हल्ला झाला यावेळी विन्स वरच्या मजल्यावर झोपला होता. हल्लेखोरांनी विटांचा वापर करून पुन्हा एकदा दोन्ही कार आणि घरांच्या खिडक्या फोडल्या. विन्सने सांगितले की, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जेव्हा त्याचे कुटुंबीय त्याचा सहकारी क्रिकेटपटू ख्रिस वुडच्या घरून डिनर करून परतले तेव्हा हा हल्ला झाला.
हेही वाचा – VIDEO: “कर्णधारपद आणि प्रसिद्धी मिळताच विराट बदलला, पण रोहित…” अनुभवी फिरकीपटू नेमकं काय म्हणाला?
“जर कोणाला काही माहीत असेल, किंवा हल्ल्याच्या फुटेजमध्ये काहीही दिसले असेल की ज्यामुळे काही मदत होऊ शकते, तर कृपया आमच्याशी किंवा हॅम्पशायर पोलिसांशी संपर्क साधा. नेमकं काय चाललं आहे हे शोधण्यासाठी आणि आमचा जीव वाचवण्यासाठी ही माहिती महत्त्वाची असू शकते.” तो म्हणाला.