इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा आहे. एरव्ही मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या रुटने यावेळी मात्र लोकांची मनं जिंकली आहेत. चौकार षटाकारांची आतषबाजी केल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मैदानात गुंजतो. मात्र, पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रुटने असं काही केलं की, सोशल मीडियावर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आता जो रुटने नेमकं काय केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच मिळेल.
रावलपिंडी मैदानात नेमकं काय घडलं?
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामनाच्या पार्श्वभूमीवर जो रुट त्याच्या सहकाऱ्यांसोबत रावलपिंडी मैदानावर सरावासाठी पोहोचला. त्याचदरम्यान एक मांजरीचं पिल्लू मैदानावर असल्याचं जो रूट आणि इतर खेळाडूंना दिसलं. क्षणाचाही विलंब न लावता जो रुटने मांजरीच्या पिल्लासाठी एका भांड्यात दूध आणलं. हे पिल्लू दूध पित असताना रुटसह अन्य खेळाडूंना मनस्वी आनंद झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. जो रुटचा पाळीव प्राण्यांप्रती असलेला जिव्हाळा आणि प्रेम या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
जो रुटचा हा व्हिडीओ Englands Barmy Army नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड गाजला आहे. तब्बल पाच लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजरने कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने म्हटलं, ‘तुम्ही किती दयाळू व्यक्ती आहात’. तर दुसरा युजर कमेंट करत म्हणाला, अरे देवा, ‘हे खूप सुंदर आहे.’