इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंड संघ हैदराबाद इथे दाखल झाला. पाकिस्तानी वंशाचा फिरकीपटू २० वर्षीय शोएब बशीरला भारताचा व्हिसा न मिळाल्याने तो मायदेशी परतला होता. परंतु, आता त्याला व्हिसा मिळाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमईए) एका सूत्राने सांगितलं की, बशीरला युनायटेड किंगडमला परतल्यावर व्हिसा देण्यात आला. इंग्लंड संघातील इतर सदस्यांपेक्षा त्याचा अर्ज बराच उशीरा मंजूर झाला. कारण तो मूळचा पाकिस्तानी आहे.
“एक प्रक्रिया सुरू आहे आणि त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने या आठवड्याच्या सुरुवातीला मंजुरी मिळाली. लंडनमधील उच्चायुक्तालयातील अधिकारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) संपर्कात होते. जेणेकरून खेळाडूचा व्हिसा त्याला त्वरित जारी केला जाईल. त्याने आपला पासपोर्ट सादर केल्यामुळे त्याचा व्हिसा जारी करण्यात आला आहे”, सूत्राने सांगितले.
शोएबचा जन्म इंग्लंडमधल्या सरे प्रांतात झाला आहे आणि त्याच्याकडे इंग्लंडचा पासपोर्ट आहे. शोएबचे आईवडील पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानची पार्श्वभूमी असणाऱ्या नागरिकांना भारतात प्रवेशासाठी व्हिसा मिळताना अडचण निर्माण होते. शोएबने वयोगट स्पर्धा सरे संघाकडून खेळल्या. त्यानंतर तो सॉमरसेट संघासाठी खेळू लागला. ६ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने १० विकेट्स पटकावल्या आहेत. सरे इथे सिद्धार्थ लाहिरी यांच्या रॉयल्स अकादमीत शोएबने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजालाही उशिराने व्हिसा मिळाला होता. उस्मान ऑस्ट्रेलियाकडून खेळत असला तरी त्याचा जन्म पाकिस्तानातल्या इस्लामाबाद इथे झाला आहे. पाकिस्तान संघाला वर्ल्डकपसाठी भारतात यायचं होतं. त्यावेळी त्यांनाही अगदी शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला. या गोंधळामुळे त्यांनी दुबईत आयोजित सराव शिबीर रद्द केलं.
११ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली. त्यात शोएबचा समावेश होता. बशीर, अन्य संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी व्हिसा अर्ज दाखल करण्यात आले. या संघात पाकिस्तानी वंशाचा रेहान अहमदही आहे. मात्र त्याला व्हिसा मिळाला. वर्ल्डकप काळातही रेहान राखीव खेळाडूंमध्ये होता.
इंग्लंडमध्ये कागदपत्रांची पूर्तता होऊन शोएब भारतात येईल असा विश्वास चाहत्यांना होती. पण जो गोंधळ झाला त्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स नाराज झाला. स्टोक्स म्हणाला, कर्णधार म्हणून मला त्याच्यासाठी खूपच वाईट वाटत आहे. आम्ही डिसेंबरच्या मध्यातच संघाची घोषणा झाली. पुरेसा वेळ होता. व्हिसा न मिळाल्यामुळे शोएबला मायदेशी परतावं लागलं आहे. इंग्लंड संघात त्याला प्रथमच संधी मिळाली होती. तो अनुभव असा असू नये असं मला वाटतं. त्याच्यासाठी हा खास दौरा आहे. लवकरच त्याला व्हिसा मिळून तो इथे असेल, अशी आशा त्याने व्यक्त केली होती.