करोनामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आता यूएईत पुन्हा सुरू होत आहे. या लीगमध्ये विदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) इंग्लंडचे खेळाडू आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध होऊ शकतात, असे सूचित केले आहे.

ईसीबीने सांगितले, “खेळाडूंना त्यांचे व्यस्त वेळापत्रक सांभाळावे लागेल. या चर्चा सुरू आहेत, परंतु कोणताही निर्णय खेळाडूंशी बोलल्यानंतरच घेतला जाईल.” इंग्लंड सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करणार होता, पण तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. यानंतर इंग्लिश क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले, “आयपीएलचा सन्मान लक्षात घेता आम्ही आमच्या खेळाडूंशी चर्चा करत आहोत. बांगलादेश दौरा पुढे ढकलण्यात आल्याने खेळाडूंना आयपीएलमध्ये उपलब्ध होण्याची संधी असेल. खेळाडूंना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांचे वेळापत्रक सांभाळावे लागते. चर्चा सुरूच आहे. परंतु कोणताही निर्णय खेळाडूंशी बोलल्यानंतरच घेतला जाईल.”

हेही वाचा – …जेव्हा कोच आपल्याच क्रिकेट मंडळाच्या सदस्याशी भिडतो!

१९ सप्टेंबरपासून पुन्हा सुरुवात

४ मे रोजी भारतात बंद करण्यात आलेली आयपीएल आता १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये पुन्हा सुरू होत आहे. या लीगचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दुसऱ्या टप्प्याचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.

दुसरीकडे, १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजाहमध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील.

Story img Loader