अनाकलनीय या एकाच संज्ञेने वर्णन करता येईल, असा सुमार खेळ करत भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडपुढे तिसऱ्याच दिवशी सपशेल लोटांगण घातले. दुसऱ्या डावात ३३८ धावांनी पिछाडीवर पडलेला भारतीय संघ ३० षटकेही खेळू शकला नाही आणि ९४ धावांतच त्यांचा खुर्दा उडाला. लाजिरवाण्या कामगिरीमुळे इंग्लंडच्या संघाने एक डाव आणि २४४ धावांच्या दणदणीत फरकाने कसोटीवर कब्जा केला. या विजयासह इंग्लंडने ही मालिका ३-१ अशी जिंकली.
३३८ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. जेम्स अँडरसनने मुरली विजयला पायचीत टिपले. त्याला केवळ २ धावा करता आल्या. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न गौतम गंभीरच्या अंगलट आला. शिखर धवनच्या जागी संघात संधी मिळालेल्या गंभीरने केवळ ३ धावा केल्या. या खराब खेळामुळे गंभीरच्या संघातील स्थानावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेम्स अँडरसनने चेतेश्वर पुजाराला जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने ११ धावा केल्या. गॅरी बॅलन्सच्या अफलातून झेलमुळे अजिंक्य रहाणेला तंबूत परतावे लागले. पहिल्या डावात संघाच्या ८० टक्के धावा करणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी भोपळाही फोडू शकला नाही. ख्रिस वोक्सने त्याला बाद केले. विराट कोहली आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ख्रिस जॉर्डनने कोहलीला बाद करत ही जोडी फोडली. त्याला केवळ २० धावा करता आल्या. पुढच्याच षटकात जॉर्डनने रवीचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांना बाद करत भारताच्या कसोटी वाचवण्याच्या आशा संपुष्टात आणल्या. काहीही आवश्यकता नसताना धाव घेण्याच्या प्रयत्नात वरुण आरोन धावचीत झाला.
चहापानाच्या सत्रापर्यंत तरी भारतीय संघ पराभव लांबवणार अशी आशा होती. मात्र ख्रिस जॉर्डनच्या उसळत्या चेंडूवर इशांत बाद होताच इंग्लंडच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. भारताचा दुसरा डाव २९.२ षटकांत ९४ धावांतच आटोपला. ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक ४ बळी घेतले. भारतातर्फे स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक २५ धावा केल्या. २०११ मध्ये भारताला इंग्लंडकडून ०-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. शतकी खेळी साकारणाऱ्या जो रूटला सामनावीर तर जेम्स अँडरसन आणि भुवनेश्वर कुमार यांना मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांची टांकसाळ उघडली त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. तत्पूर्वी ७ बाद ३८५ वरुन पुढे खेळणाऱ्या इंग्लंडने १०१ धावांची महत्त्वपूर्ण भर घातली. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर तीन धावा घेत जो रूटने कारकिर्दीतील पाचव्या शतकाची नोंद केली. ख्रिस जॉर्डनने २० धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉडने ५ चौकार आणि एका षटकारासह ३७ धावांची खेळी करत रूटला चांगली साथ दिली. जो रूटने १८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १४९ धावांची सुरेख खेळी साकारली. इंग्लंडचा डाव ४८६ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे इशांत शर्माने ४ तर रवीचंद्रन अश्विनने ३ बळी घेतले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : सर्व बाद १४८
इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद ४८६ (जो रूट नाबाद १४९, अॅलिस्टर कुक ७९; इशांत शर्मा ४/९६, आर. अश्विन ३/७२)
भारत (दुसरा डाव) : २९.२ षटकांत सर्व बाद ९४ (स्टुअर्ट बिन्नी नाबाद २५, विराट कोहली २०; ख्रिस जॉर्डन ४/१८, जेम्स अँडरसन २/१६).
पानिपत!
अनाकलनीय या एकाच संज्ञेने वर्णन करता येईल, असा सुमार खेळ करत भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत इंग्लंडपुढे तिसऱ्याच दिवशी सपशेल लोटांगण घातले.
First published on: 18-08-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England demolish india to win series