भारतात आषाढात जिथे वारकऱ्यांना पंढरीचे वेध लागलेले आहेत, तसेच क्रिकेटच्या पंढरीची क्रिकेटप्रेमींना आस लागलेली आहे. क्रिकेटप्रेमींची पावले आता लॉर्ड्सची वाट धरायला लागले असून निमित्त आहे ते दुसऱ्या अ‍ॅशेस सामन्याचे. तीन दिवसांपूर्वी थरारक अ‍ॅशेस मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला. हा सामना जेवढा सनसनाटी झाला तेव्हाच तो गाजला सदोष पंचगिरीमुळेही. पण जे झाले ते सारे विसरून दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीच्या तयारीला लागलेले आहेत. मालिकेत आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न यजमान इंग्लंड एका बाजूने करतील, तर दुसऱ्या बाजूला मालिकेत बरोबरी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाच्या संघावर या वेळी माजी प्रशिक्षक मिकी आर्थरप्रकरणाची काळी छाया नक्कीच असेल.
मुदतीपूर्वी करार भंग केल्याने आर्थर यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाकडे नुकसानभरपाई तर मागितलीच, पण पुढे जाऊन त्यांनी कर्णधार मायकेल क्लार्क आणि शेन वॉटसन यांच्यामध्ये विस्तवही जात नसल्याचा खुलासा केल्याने ऑस्ट्रेलियाच्या संघातील राजकारण चव्हाटय़ावर आले आहे आणि त्यामुळे ‘‘संघात सारे काही आलबेल आहे,’’ अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार ब्रॅड हॅडिनला द्यावी लागली. कुठे ना कुठे तरी या गोष्टींचा विपरीत परिणाम ऑस्ट्रेलियाच्या संघावर होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातून संघातील खेळाडूंना बाहेर काढण्याची जबाबदारी विद्यमान प्रशिक्षक डॅरेन लिहमन यांच्यावर असेल.
ऑस्ट्रेलियाचे पारडे अ‍ॅशेसपूर्वीच हलके होते आणि याची कबुली क्लार्कनेही दिली होती. पण पहिल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडला चांगलीच टक्कर दिली आणि हीच त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्ट असेल. फलंदाजीमध्ये सलामीवीर ख्रिस रॉजर्स आणि फिलीप ह्य़ुजेस यांनी पहिल्या सामन्यात अर्धशतके झळकावली असली तरी त्यांच्याकडून मोठय़ा खेळी पाहायला मिळालेल्या नाहीत. क्लार्क आणि शेन वॉटसन या अनुभवी खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जोपर्यंत या दोघांपैकी एक जण खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहत नाही, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारणे सहज शक्य होऊ शकणार नाही. हॅडिनने दुसऱ्या डावात दिलेली झुंज नक्कीच प्रशंसनीय होती. पदार्पण करणाऱ्या अ‍ॅश्टॉन अ‍ॅगरने जिगरबाज ९८ धावांची खेळी साकारल्याने त्याला या सामन्यात संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियन्स हे जिगरबाज आणि संघर्षपूर्ण असल्याचे साऱ्यांनीच पाहिले असून ते दुसऱ्या सामन्यात मालिकेतील पुनरागमन करू शकतील.
लॉर्ड्सवर झालेल्या गेल्या अ‍ॅशेस सामन्यात इंग्लंडने ११५ धावांनी विजय मिळवला होता आणि आताच्या घडीला १-० अशी आघाडी घेऊन ते लॉर्ड्सवर आले असल्याने त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसन हा त्यांचा कणा आहे. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि ग्रॅमी स्वान यांची साथ त्याला मिळत आहे. पण चौथा गोलंदाज म्हणून फिनला छाप पाडता आलेली नाही. फलंदाजीमध्ये कर्णधार कुकची बॅट अजूनही तळपलेली नाही. इयान बेलच्या दुसऱ्या डावातील शतकाने त्याचे मनोधैर्य कमालीचे उंचावलेले असेल. पण जोनाथन ट्रॉट आणि केव्हिन पीटरसन यांना अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
प्रतिस्पर्धी संघ
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जो रुट, जोनाथन ट्रॉट, इयान बेल, केव्हिन पीटरसन, जॉनी बेअरस्टो, मॅट प्रॉयर, ग्रॅमी स्वॉन, स्टीव्हन फिन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, टीम ब्रेसनन, ग्रॅहम ओनियन्स.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), शेन वॉटसन, इडी कोवान, फिलीप ह्य़ूज, स्टीव्हन स्मिथ, ख्रिस रॉजर्स, उस्मान ख्वाजा, ब्रॅड हॅडिन, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, जेम्स पॅटिन्सन, मिचेल स्टार्क, पीटर सिडल, जॅक्सन बर्ड, जेम्स फॉल्कनर, रायन हॅरिस, नॅथन लियॉन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट वाहिनीवर
वेळ : दुपारी ३.३० वा. पासून

इंग्लंडची राणी दुसऱ्या दिवसाचा खेळ पाहणार
लंडन : अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या दिवशीचा खेळ पाहण्यासाठी इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी उपस्थित राहणार आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी ८७ वर्षीय राणी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर उपस्थित राहणार आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी राणी दोन्ही संघांचे खेळाडू ,पंच आणि सामनाधिकारी यांची भेट घेणार आहे. मेरलीबोन क्रिकेट क्लबच्या प्रसिद्ध लाँग रूमला राणी भेट देणार असून, या वेळी दोन्ही संघांच्या प्रशिक्षक आणि अन्य सहकाऱ्यांना भेटणार आहे

Story img Loader