क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स. ढगांनी मळभाटलेली शुक्रवारची सकाळ. आठवड्यातला मधला दिवस असूनही मैदान गच्च भरलेलं. प्रेक्षकात उत्साह होता पण अनामिक हुरहूर दाटलेली. एका कर्त्या माणसाच्या निवृत्तीचा क्षण काही तासांवर होता. त्याचं नाव- जेम्स अँडरसन. मिस यू जिमी, लव्ह यू जिमीचे फलक विहरत होते. जायंट स्क्रीनवर त्याचा फोटो आणि आकडेवारी सातत्याने झळकत होती. आग ओकणारा गोलंदाज अशी प्रतिमा असलेला दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन खास अँडरसनचा शेवटचा सामना अनुभवायला उपस्थित होता. ट्वीटर म्हणजे एक्सवर #जेम्स अँडरसन आणि #704 हे हॅशटॅग ट्रेंडू लागले होते. अँडरसनचा इतक्या वर्षांचा साथीदार स्टुअर्ट ब्रॉड कॉमेंट्री करत होता. २१ वर्षांपूर्वी अँडरसनच्या पदार्पणावेळी इंग्लंडचा कर्णधार असलेला नासिर हुसेनही कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याच्याबद्दल बोलत होता. हे सगळं सुरू असताना प्रत्यक्ष मैदानात घडलेल्या काही गोष्टी पाहणं अत्यावश्यक आहे.

वेस्ट इंडिजने या सामन्यात सपशेल शरणागती पत्करलेली. अतिशय सुमार, रटाळ आणि एकतर्फी सामना. इंग्लंडचं जिंकणं ही निव्वळ औपचारिकता शुक्रवारी सकाळी बाकी होती. वेस्ट इंडिजची दुसऱ्या डावात 89/7 अशी परिस्थिती होती. पदार्पणवीर गस अँटकिन्सच्या गोलंदाजीवर गुदकेश मोटीने कव्हर्स क्षेत्रात चेंडू तटवला, चेंडू चौकार जाणार असंच वाटलं पण ४१वर्षीय अँडरसनने चेंडूमागे धावायला सुरुवात केली. चेंडू त्याला हरवून सीमारेषेपल्याड जाणार वाटत असतानाच त्याने डाईव्ह मारली, एक धाव वाचवली आणि खणखणीत थ्रो केला. अख्ख्या मैदानाने जोरदार टाळ्यांनी त्याचं कौतुक केलं. अँडरसनने विस्कटलेला पोशाख नीट केला, टोपी जागेजमी बसवली आणि तो शांतपणे जिथे उभा होता तिथे परतला.

milind kale appointed as chairman of the board of management of cosmos bank
कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद काळे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
actor Sudip Pandey died of heart attack
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, इंजिनिअरींग सोडून आलेला सिनेविश्वात
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
I could have played more but it is always better to finish when R Ashwin statement on retirement
R Ashwin : ‘मी अजून खेळू शकलो असतो, पण…’, निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर आर अश्विनचं मोठं वक्तव्य
Iqbal Chagla passed away, Senior lawyer Iqbal Chagla,
ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे निधन
Rohit Sharma was going to retire after the Melbourne Test but A well wisher forced to change of decision
Rohit Sharma : रोहित शर्मा मेलबर्न कसोटीनंतर घेणार होता निवृत्ती; कोणामुळे बदलला निर्णय? जाणून घ्या
Image Of Tim Cook Apple CEO
Apple CEO Salary : टिम कूक यांच्या पगारात घसघशीत वाढ, २०२४ मध्ये अ‍ॅपल कंपनीकडून मिळाले ६४३ कोटी रुपये

काही मिनिटातच गस अॅटकिन्सनने विकेट घेतली. पदार्पणाच्या टेस्टमध्ये १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. नासिर हुसेन म्हणाला, past has bowled an over, present is bowling an over- baton has been passed from Anderson to Atkinson.

अँडरसनला शेवटची विकेट मिळावी यासाठी अॅटकिन्सनने काही स्वैर चेंडूही टाकले. अँडरसन गोलंदाजीसाठी आला. १५व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर गुदकेश मोटीने समोरच चेंडू मारला. अँडरसनच्या डाव्या हातात चेंडू येऊन बाहेर पडला. अख्ख्या स्टेडियमने ओह केलं. अँडरसनने झेल सुटला या निराशेत जीभ चावली.

कामाप्रति निष्ठा, सचोटी आणि जिंकण्यासाठी १०० टक्के प्रयत्न या तीन गुणांचा प्रत्यय घडवत इंग्लंडचा कर्ताधर्ता जेम्स अँडरसनने २१ वर्ष, १ महिना आणि २१ दिवसांनंतर क्रिकेटला अलविदा केला. १८८ कसोटी सामने आणि ७०४ विकेट्स या अचंबित करणाऱ्या आकडेवारीसह जेम्स अँडरसन नामक अवलियाचा मैदानावरचा मॅरेथॉन प्रवास थांबला.

अँडरसनचा प्रवास समजून घेणं माणूस म्हणून फार महत्त्वाचं. एखाद्या ऑफिसात एखादा माणूस खूप वर्ष काम करत राहिला तर तो आपोआप सीनिअर होतो. पण तो खरंच सीनिअर म्हणजे ज्येष्ठ होतो का? आदराचे खूप पदर असतात. आदर विस्मडचा अर्थात ज्ञानाचा असतो. आदर हुद्याचा असतो. आदर कर्तृत्वाचा असतो. आदर अनुभवाचा असतो. अँडरसन नुसता खेळत राहिला नाही. तो बहरत गेला, मोठा होत गेला, संघाला जिंकून देत गेला, तो पोरगेला होता तो कर्ता झाला, तो आधारवड झाला. कोणत्याही माणसाची प्रगतीची प्रक्रिया नैसर्गिक असते तेव्हा ती तुम्हाला दिसते. कारण ती एका रात्रीत घडत नाही. हळूहळू घडते. खाचखळगे असतात. निराशा, अपयशात तो माणूस कसा वागतो तेही दिसतं. संकटांना तो कसा सामोरं जातो तेही कळतं. त्या माणसाचं मोठं होणं एका माणसापुरतं राहत नाही, तो माणूसच एक विद्यापीठरुपी व्यवस्था होतो. रूढार्थाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अशी त्याची २००३ मध्ये ओळख करुन देण्यात आली. २१ वर्षानंतर महान खेळाडू, महान गोलंदाज, इंग्लंडचा मॅचविनर ही त्याची ओळख आहे. चंद्रकोर जशी कलाकलाने वाढत जाते तसा अँडरसनचा हा प्रवास शीतल आनंद देणारा.

वेगवान गोलंदाज म्हटलं की भन्नाट वेग, आग ओकणं, शेरेबाजी हे सगळं येतं. अॅम्ब्रोज-वॉल्श, अक्रम-वकार, डोनाल्ड-स्टेन, मॅकग्रा-ब्रेट ली हे सगळे कर्दनकाळ होते. त्यांच्या नजरेत भेदकता होती. अँडरसनकडे यातलं काहीही नाही. छाताडाचा वेध घेईल असा उसळता चेंडू टाकण्यासाठी प्रसिद्ध नाही. अंगठ्याचा वेध घेईल असा यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध नाही. तरीही लाल चेंडू या एकमेव शस्त्रानिशी अँडरसन जी किमया साधत असे ते पाहणं निखळ आनंददायी असे. नवा कोरा चेंडू टप्पा पडून आत येणं आणि टप्पा पडून बाहेर निघणं या दोन कौशल्यांमध्ये अँडरसन पारंगत होता. ऑफस्टंप लक्ष्य करुन त्या टप्प्यावर गोलंदाजी करणं अँडरसनची खासियत. चेंडू सोडावा तर आत येऊन त्रिफळा उडतोय. चेंडू ड्राईव्ह करायला जावं तर बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये झेल जातोय- अँडरसनचा सामना करणं म्हणजे फलंदाजांची त्रेधातिरपीट. ढगाळ मळभट वातावरण अँडरसनसाठी पोषक. फलंदाजांना तो अक्षरक्ष: मामा बनवत असे. आशियाई उपखंडात गोलंदाजी करणं म्हणजे वेगवान गोलंदाजांसाठी जीव काढणारा प्रकार. अँडरसनने या प्रदेशात कशी गोलंदाजी करावी याचं एक प्रारुप विकसित केलं. प्रचंड उकाडा, आर्द्रता, फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्ट्या अशा सगळ्या प्रतिकूल समीकरणातही अँडरसन आपली शस्त्रं परजत असे. धावा लुटल्या गेल्या तरी नाऊमेद होत असे. फलंदाजांच्या अर्धशतकाने, शतकांनी तो खचून जात नसे. वेगवान गोलंदाजांचं शरीर हे दुखापतीचं आगार असतं. अँडरसनलाही दुखापतींनी सतवलं पण सुदैवाने कारकीर्द धोक्यात येईल अशी दुखापत त्याला झाली नाही.

मुळातच २१ वर्ष एखादं काम इमानेइतबारे करत राहणं हेच किती दुर्मीळ आहे. कामाचा कंटाळा येऊ न देणं, काम चोख व्हावं यासाठी नवीन कौशल्यं शिकणं, नव्या सहकाऱ्यांशी, नव्या कर्णधाराशी, नव्या प्रशिक्षकाशी जुळवून घेणं हेही कठीणच आहे. ३ वर्षात ६ कंपन्या- दुसऱ्या कंपनीने दिलेली ऑफर दाखवून सध्याच्या कंपनीत पद, पगार वाढवून घेणं या कालखंडात जेम्स अँडरसन कालबाह्य ठरू शकतो. त्याने २१ वर्ष एकाच कंपनीसाठी काम केलं. आपल्याला काय येतं हे जितकं लवकर समजेल तेवढं चांगलं असतं पण त्याचवेळी काय करू नये आणि काय झेपणार नाही हे आधी कळायला हवं. २००९ नंतर अँडरसन इंग्लंडसाठी टी२० खेळलेला नाही. २०१५ नंतर अँडरसन एकदिवसीय खेळलेला नाही. कसोटीवर लक्ष केंद्रित करायचं असेल तर सगळं खेळत बसणं शरीराला आणि मनाला त्रासदायक ठरू शकतं हे अँडरसनने जाणलं. आयपीएल काळात खेळत असूनही अँडरसन या स्पर्धेकडे फिरकला नाही. एकाअर्थी तो पैशापासून दूर राहिला. मल्टीटास्किंग सगळ्यांनाच जमत नाही. मल्टीटास्किंग आणि एक ना धड भाराभर चिंध्या यातला फरक धूसर असतो. अँडरसन पांढऱ्या कपड्यांच्या कसोटी प्रकाराशी एकनिष्ठ राहिला. वेगवान गोलंदाजांना क्षेत्ररक्षणात लपवावं लागतं अशी स्थिती असते. अँडरसन याला ठोस अपवाद होता. अँडरसन खतरनाक असा स्पेल टाकत असतानाच स्लिपमध्ये, गलीमध्ये, लेग स्लिपला अशा कठीण ठिकाणी क्षेत्ररक्षणाला उभा राहत असे. चेंडू त्याच्या हातून सुटत नसे. फलंदाजी हा अँडरसनचा विषय नाही पण गरज पडली तेव्हा त्याने बॅटसह किल्ला लढवला आहे.

तुम्ही साधा विचार करा. तुमच्या भवतालात ४१ वयाची माणसं काय स्थितीत आहेत?- कोणाला डायबेटिस डिटेक्ट झालाय, कोणाला अॅसिडिटीचा त्रास आहे, कोणाला एक जिना चढला तरी धाप लागतेय, कोणाला पोटाचा विकार झालाय, कोणाचा निद्रानाश तर कोणाला मणक्याचा आजार तर कोणाला मायग्रेन. कुठे जायचं झालं की पेटीभर औषधं बरोबर घ्यावी लागतात अशी अवस्था. अनेक युगांमध्ये त्यांच्यापैकी कुणीही स्पर्धात्मक १० मिनिटांसाठीही खेळलेलं नाही. स्वत: धावणंपळणं दूर राहिलं, टीव्हीवर फुटबॉलसारखा दमसासाची परीक्षा बघणारा खेळ पाहणंही त्यांनी सोडून दिलंय. ब्रँडेड शोरुममध्ये खरेदीला गेल्यावर पोटाचा घेर वाढत असल्यामुळे त्यांची मीडियम गटातून एक्सेल गटात रवानगी झाली आहे. हे सगळं एकीकडे आणि दुसरीकडे चाळिशीत येऊनही अँडरसन पल्लेदार स्पेल टाकतोय, विकेटनंतर उडी मारतोय, एक धाव वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतोय. अँडरसनचा देश, वातावरण आणि बाकी परिस्थिती नक्कीच वेगळं आहे पण ‘फोर्टी इज नेक्स्ट सिक्टी’ म्हणणाऱ्यांसाठी अँडरसन ही चपराक आहे. शेवटच्या कसोटीतही तो खेळायला उतरला तेव्हा त्याचं शरीर खेळाडूला साजेशा आकारमानात होतं. अरे त्याचं वय झालंय, त्याला नको त्रास असं काहीही कर्णधाराला म्हणावं लागलं नाही. अँडरसन संघासाठी कधीच भार झाला नाही. त्याने सबबी दिल्या नाहीत. व्यावसायिक स्पर्धात्मक खेळायचं असेल तर सर्वोत्तम फिटनेस हवा हा मूलमंत्र अँडरसनने ४१व्या वर्षीही खेळताना जपला.

अँडरसन म्हणजे अनेक पावसाळे-उन्हाळे पाहूनही ठाशीव राहिलेल्या शिसवी लाकडी कपाटासारखा आहे. बाह्य कल्लोळाचा त्याने त्याच्यावर परिणाम होऊ दिलेला नाही. नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या मंडळींसाठी एखादी वस्तू घेतली की ती वर्षानुवर्षे वापरणं हे स्वाभाविक. अँडरसन या काळाचा प्रतिनिधी. वर्षभरही टिकू न शकणाऱ्या उत्पादनांच्या काळात अँडरसनचं असणं हीच एक संजीवनी होती. वर्षभरात पुरवून पुरवून ही संजीवनी अनुभवता येत असे. आता ही संजीवनी नसेल.

२१ वर्षांपूर्वी अकरावीच्या उंबरठ्यावर असताना टीव्हीवर अँडरसनचा पदार्पणाचा सामना पाहिल्याचं स्पष्ट आठवतंय. लॉर्ड्सवर ढगाळ वातावरणात केसांमध्ये एक रंगीबेरंगी बट असलेल्या अँडरसनने मार्क व्हरम्युलेनचा त्रिफळा उडवत दिमाखदार सुरुवात केली होती. २१ वर्षानंतर त्याच लॉर्ड्सवर दाढी पिकलेल्या अँडरसनला ‘गार्ड ऑफ ऑनर’ मिळताना ओटीटीवर पाहिलं. एक वर्तुळ पूर्ण होऊन थांबलं म्हणायचं……

Story img Loader