इंग्लंड हे फुटबॉलचे माहेरघर. सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंग्लिश प्रीमिअर लीग याच देशातली. जगातील अव्वल खेळाडूंसह मायदेशातील दिग्गज खेळाडूंना नावलौकिक, गडगंज पैसा मिळवून देणारी ही स्पर्धा. याच स्पर्धेत खेळून इंग्लंडचे खेळाडू मोठे होतात. मात्र फिफा विश्वचषकासाठी दावेदार असणारा इंग्लंड हा संघ पहिल्याच फेरीत गारद झाल्याने इंग्लिश फुटबॉल किती दुबळे झाले आहे, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
खरे तर इंग्लिश प्रीमिअर लीगमधील प्रत्येक संघात किमान पाच इंग्लिश फुटबॉलपटूंचा समावेश असावा, असा नियम आहे. त्यामुळे इंग्लंडमधील बडय़ा खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी या क्लब्समध्ये चढाओढ सुरू असते. इंग्लंडमधील सर्व खेळाडू हे राष्ट्रीय लीगमध्ये खेळत असल्यामुळे त्यांना परदेशातील लीगमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची संधी मिळत नाही. त्याउलट लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार, करिम बेन्झेमा, सर्जीओ अ‍ॅग्युरो यांच्यासारखे खेळाडू परदेशात जाऊन आपली छाप पाडतात. अनेक क्लब्स या इंग्लिश खेळाडूंना कमी वेळ खेळवून त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देत नाहीत. त्यामुळेच स्कॉट सिंकलेअर, जॅक रॉडवेल, जेम्स मिलनेर हे मँचेस्टर सिटीचे तर डॅनी वेलबॅक आणि टॉम क्लेव्हरले हे मँचेस्टर युनायटेडचे खेळाडू राखीव खेळाडू म्हणूनच वावरताना दिसतात.
‘थ्री लायन्स’ म्हणून ओळखला जाणारा इंग्लिश संघ या वेळीही विश्वचषकासाठी दावेदार मानला जात होता. पण ब्राझीलमध्ये दमदार कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात होती का आणि रॉय हॉजसन यांची व्यूहरचना प्रभावी होती का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हॉजसन यांची रणनीती दोन्ही सामन्यांत फोल ठरली. त्यामुळेच इंग्लंडवर १९५८नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. कमकुवत बचावफळी आणि जॉन टेरी, रिओ फर्डिनांड व अ‍ॅशले कोल यांसारख्या अनुभवी खेळाडूंना संघातून दिलेला डच्चू हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जाते. त्याउलट हॉजसन यांनी रॉस बार्कले, रहीम स्टर्लिग आणि ल्युक शॉ यांना संधी दिली. पण ते प्रशिक्षकांच्या विश्वासाला सार्थ ठरले नाहीत. स्टीव्हन गेरार्ड, फ्रँक लॅम्पार्ड, वेन रूनी यांसारखे अनुभवी खेळाडू संघात असूनही ते इंग्लंडला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवून देऊ शकले नाहीत. इंग्लंडचा बचाव इतका पोकळ होता की इटली आणि उरुग्वेसारख्या संघांना सहजपणे गोल करता आले. वेन रूनी हा इंग्लंडचा हुकमी एक्का. पण गेल्या तीन विश्वचषक स्पर्धामध्ये खेळणाऱ्या या दिग्गज खेळाडूला या वेळी पहिला गोल लगावता आला. काही वेळा गोल करण्याची संधी असताना रूनी चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी धडपडत होता. इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, पण कोस्टा रिकाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही ते विजय मिळवू शकतील का, याबाबत साशंकता आहे. कारण कोस्टा रिकाने उरुग्वेनंतर इटलीला पराभवाचे पाणी पाजले आहे. इंग्लंडच्या सुवर्णकाळाचे शिलेदार असलेले आणि कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या गेरार्ड आणि लॅम्पार्ड यांच्यासाठी हा शेवटचा सामना ठरण्याची शक्यता आहे.
अर्जेटिना, ब्राझील, फ्रान्स यांच्यासारखे अनेक संघ इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये छाप पाडणाऱ्या खेळाडूंनाच घेऊन विश्वचषकासाठी आपला संघ तयार करतात. इंग्लंडचे तर सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळतात. पण आता इंग्लंडवर आत्मपरीक्षण करण्याची आणि इंग्लिश क्लब्सवर असलेल्या मर्यादा उठवण्याची वेळ आता आली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना बेंचवर बसण्यापेक्षा त्यांना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्याची आवश्यकता आहे. इंग्लंडला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा मानाचे स्थान मिळवायचे असेल तर या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

Story img Loader