* इंग्लंडचा ५०९ धावांचा डोंगर, १९३ धावांची आघाडी
* कुकचे द्विशतक हुकले, ट्रॉट, पीटरसन यांची अर्धशतके
* तिसऱ्या दिवशीही भारताची गोलंदाजी बोथट

ईडन गार्डन्सची खेळपट्टी म्हणजे इंग्लंडच्या फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेले असून, त्यांचा धावांचा ओघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही कायम राहिला, त्यामुळे ईडन गार्डन्सचे रूपांतर ‘इंग्लंड गार्डन्स’मध्ये झाल्याचे तरी सध्या चित्र आहे. कर्णधार कुकचे दुर्दैवीरीत्या द्विशतक हुकले असले तरी जोनाथन ट्रॉट आणि केव्हिन पीटरसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ५०९ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९३ धावांची आघाडी आहे. भारताची गोलंदाजी तिसऱ्या दिवशी फिरकीला मदत मिळत असतानाही बोथट वाटली. त्यामुळे उद्या सामन्याच्या चौथ्या दिवशी शक्य तेवढय़ा धावा करून चौथ्या डावातील फलंदाजी टाळण्याचे इंग्लंडच्या संघाचे प्रयत्न असतील. दुसरीकडे भारतीय संघाला तिसऱ्या दिवशीही घरच्या मैदानात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसल्याने पराभवाची नामुष्की त्यांच्यावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. १९९९ नंतर भारतीय संघाने ईडन गार्डन्सवर एकही कसोटी सामना गमावला नसून या वेळी त्यांना हाच निकाल कायम ठेवता येतो का, याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल.
पहिल्या सत्रात गोलंदाजीला मदत मिळत असली तरी भारतीय गोलंदाजांचा मारा मात्र बेजान, असाच होता. दिवसाची सावधपणे सुरुवात कुक आणि ट्रॉट या दोघांनी केली. गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा पुरेपूर उचलत या दोघांनीही कालांतराने काही मोठे फटके खेळायला सुरुवात केली आणि त्यापुढे पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजी दबली गेली. कुकने दीडशतक झळकावत आपले इरादे स्पष्ट केले खरे, पण इशांत शर्माने स्वत:च्याच गोलंदाजीवर कुकचा १५६ धावांवर झेल सोडत त्याला पुन्हा जीवदान दिले. या साऱ्या सकारात्मक गोष्टींचा फायदा ट्रॉटलाही झाला आणि त्यानेही मालिकेतले पहिले आणि कारकीर्दीतले १३वे अर्धशतक झळकावले. या दोघांनी सकारात्मक खेळ करत उपाहारापर्यंत भारताला बळी मिळवण्यापासून दूर लोटले.
उपाहारानंतरही या दोघांनी सातत्याने धावफलक हलता ठेवला आणि संघाला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून देत भारताच्या धावसंख्येशी बरोबरीही केली. हे दोघे आता इंग्लंडला मोठी आघाडी मिळवून देतील, असे वाटत असतानाच ओझाने ट्रॉटला धोनीकरवी बाद केले, पण बाद होण्यापूर्वी ट्रॉटने १० चौकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी साकारली, त्याचबरोबर कुकसह दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी रचली. ट्रॉट बाद झाल्यावर काही वेळातच कुकही दुर्दैवीरीत्या धावचीत झाला आणि त्याची मॅरेथॉन खेळी १९० धावांवर संपुष्टात आली. विराट कोहलीच्या जवळ गेलेल्या चेंडूवर ‘नॉन-स्ट्राइक’ला असलेल्या कुकने धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण धाव घेण्याचा प्रयत्न फसेल म्हणून तो पुन्हा माघारी फिरला आणि बॅट क्रिझमध्ये ठेवली. पण इतक्यात कोहलीचा आपल्या दिशेने येणारा चेंडू लागेल म्हणून त्याने हात वर करत बॅट काढून घेतली, तितक्यात चेंडूने यष्टीचा वेध घेतला आणि दुर्दैवीपणे कुक धावचीत होऊन तंबूत परतला. त्याने या मॅरेथॉन खेळीत तब्बल ८ तास आणि १२ मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत ३७७ चेंडूंचा सामना केला आणि २३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १९० धावा फटकावल्या. या खेळीसह त्याने या मालिकेत ५०० धावा पूर्ण केल्या.
कुक बाद झाल्यावर सारी सूत्रे केव्हिन पीटरसनने (५४) आक्रमक फलंदाजी करत आपल्या हातात घेतली. चहापानानंतर ओझाला सलग दोन चौकार मारत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. अर्धशतक झळकावल्यावर पीटरसन शतकाच्या दिशेने कूच करेल, असे वाटले होते. पण अश्विनने त्याला पायचीत पकडत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. यष्टिरक्षक मॅट प्रायर (खेळत आहे ४०) आणि ग्रॅमी स्वान (खेळत आहे २१) यांनी आरामात यशस्वीपणे तिसरा दिवस खेळू काढले.     

खेळपट्टीमध्ये जास्त दम नाही. ही अजूनही फलंदाजीला पोषक खेळपट्टी आहे, त्यामुळे फलंदाजांना धावा करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. हा सामना अनिर्णित राखू, हा आम्हाला विश्वास आहे. या मैदानात आमची कामगिरी चांगली झालेली आहे. खेळपट्टीचा पोत पाहता आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू. जर आम्हाला पहिली विकेट लवकर मिळाली, त्यांना आम्ही झटपट तंबूत धाडू शकतो.
– प्रग्यान ओझा,
भारताचा फिरकीपटू

आजचा दिवस आमच्यासाठी चांगला ठरला. आम्ही दोघांनीही जास्त दडपण न घेता फलंदाजी केली. आम्हाला मोठी खेळी साकारायची होती, पण दुर्देवाने आम्ही संघाला मोठी आघाडी मिळवून देऊ शकलो नाही. कुकने अफलातून फलंदाजी केली, त्याच्याबरोबर फलंदाजी करणे नेहमीच प्रेरणादायी ठरते. अधिकाधिक आघाडी मिळवण्याकडे आमचा प्रयत्न असेल.
– जोनाथन ट्रॉट,
इंग्लंडचा फलंदाज

धावफलक
भारत (पहिला डाव) :  ३१६.
इंग्लंड (पहिला डाव) :
अ‍ॅलिस्टर कुक धावचीत  (कोहली) १९०, निक कॉम्प्टन पायचीत गो. ओझा ५७, जोनाथन ट्रॉट झे. धोनी गो. ओझा ८७, केव्हिन पीटरसन पायचीत गो. अश्विन ५४, इयान बेल झे. धोनी गो. शर्मा ५, समित पटेल झे. सेहवाग गो. ओझा ३३, मॅट प्रायर खेळत आहे ४०, ग्रॅमी स्वान खेळत आहे २१, अवांतर (बाइड १३, लेग बाइज ४, नोबॉल ५) २२, एकूण १६३ षटकांत ६ बाद ५०९.
बाद क्रम : १-१६५, २-३३८, ३-३५९, ४-३९५, ५-४२०, ६-४५३.
गोलंदाजी : झहीर खान २९-६-८२-०, इशांत शर्मा २९-८-७८-१, आर. अश्विन ५२-९-१८३-१, प्रग्यान ओझा ५०-१०-१४०-३, युवराज सिंग ३-१-९-०.