England head coach Matthew Mott has given an update on Ben Stokes: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची अवस्था वाईट आहे. इंग्लिश संघ पहिला सामना न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या तीनपैकी दोन सामने गमावल्याने इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. आता आणखी एका सामन्यात पराभव पत्करावा लागला, तर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत खूप मागे राहू शकतात. अशा परिस्थितीत इंग्लिश संघ आपला सामनाविजेता खेळाडू बेन स्टोक्सच्या मैदानात पुनरागमनासाठी इच्छुक आहे.
इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी सांगितले की, आमच्या वैद्यकीय कर्मचार्यांना काही काळापासून विश्वास आहे की, आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्टोक्सला मैदानात उतरवू शकतो. मॅथ्यू मॉट म्हणाले, ‘गेल्या २४ तासांत मला त्याच्या फिटनेसशी संबंधित कोणतेही अपडेट मिळालेले नाही, पण त्याआधी तो आमच्याकडून दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात खेळण्याच्या लक्ष्यावर होता. याबाबत आम्हाला पूर्ण आशा आहे. मैदानात परतण्यासाठी जे काही आवश्यक असेल, ते तो पूर्णपणे करू शकतो.’
एकदिवसीय क्रिकेटमध्ये निवृत्तीनंतर पुनरागमन –
बेन स्टोक्सने गेल्या वर्षीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. तो फक्त कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्येच भाग घेत होता. पण २०२३ च्या विश्वचषकासाठी त्याने आपला विचार बदलला आणि मैदानात परतण्याची घोषणा केली. मात्र, दुखापतीमुळे तो आत्तापर्यंत २०२३ च्या विश्वचषकातील एकही सामना खेळू शकलेला नाही. मॉट म्हणाले की त्यांना इंग्लंडच्या प्रयत्नांवर किंवा समर्पणावर शंका नाही, परंतु त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि ते बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत मिश्र दृष्टिकोन घेत आहेत. २१ ऑक्टोबर रोजी मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघ खेळणार आहे.
इंग्लंडने दोन मोठे जेतेपद पटकावले होते –
इंग्लंडला मागील विश्वचषक (२०१९) चॅम्पियन बनवण्यात बेन स्टोक्सची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. यानंतर २०२२ च्या टी-२० विश्वचषकातही त्याच्याच बळावर इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. अशा परिस्थितीत आता इंग्लंडच्या आशा पुन्हा एकदा या दिग्गज अष्टपैलू खेळाडूवर टिकून आहेत. स्टोक्सच्या पुनरागमनाने इंग्लंडचा आत्मविश्वास दुणावण्याची शक्यता असून तो पुन्हा एकदा विश्वविजेत्याप्रमाणे खेळताना दिसणार आहे.