स्मिथचे झुंजार अर्धशतक; यजमानांची २ बाद १८ अशी केविलवाणी अवस्था
अॅशेस कसोटी क्रिकेट मालिका
अॅशेस मालिकेतील चौथी कसोटी चौथ्या दिवशी रंगतदार अवस्थेत असून, इंग्लंडला रविवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या (८२) झुंजार खेळीच्या बळावर दुसरा डाव ६ बाद १८६ धावांवर घोषित केला. मग विजयासाठी ३८३ धावांचे आव्हान पेलण्याच्या प्रयत्नात इंग्लंडची दुसऱ्या डावात २ बाद १८ अशी अवस्था झाली.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दुसरा डाव ३०१ धावांत गुंडाळून १९६ धावांची आघाडी घेतली. मग ब्रॉड-आर्चर जोडीने त्यांची ४ बाद ४४ अशी अवस्था केली. परंतु स्मिथने मॅथ्यू वेडच्या (३४) साथीने पाचव्या गडय़ासाठी १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. स्मिथ कसोटी शतकाकडे कूच करीत असताना जॅक लीचच्या गोलंदाजीवर त्याचा संयम ढळला. त्यामुळे षटकार खेण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या स्मिथचा बेन स्टोक्सने आरामात झेल टिपला. मग ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा कोसळला.
त्यानंतर, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर अनुक्रमे रॉरी बर्न्स आणि जो रूट यांना बाद करीत इंग्लंडची २ बाद ० धावा अशी केविलवाणी अवस्था केली. इंग्लंडला विजयासाठी ३६५ धावांची आवश्यकता असून त्यांचे आठ फलंदाज बाकी आहेत.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) :८ बाद ४९७ डाव घोषित
इंग्लंड (पहिला डाव) : १०७ षटकांत सर्व बाद ३०१ (रॉरी बर्न्स ८१, जो रूट ७१; जोश हॅझलवूड ४/५७)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ४२.५ षटकांत ६ बाद १८६ डाव घोषित (स्टीव्ह स्मिथ ८२; जोफ्रा आर्चर ३/४५)
इंग्लंड (दुसरा डाव) : ७ षटकांत २ बाद १८ (जो डेन्ली खेळत आहे १०; पॅट कमिन्स २/८)