Virat Kohli vs James Anderson : नुकताच भारताचा इंग्लंड दौरा संपला आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या एजबस्टन कसोटीपासून या दौऱ्याला सुरुवात झाली होती. या कसोटी सामन्यात, पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेम्स अँडरसन आणि विराट कोहलीने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. दोघेही मैदानावर अनेकदा एकमेकांशी आनंदाने गप्पा-गोष्टी करताना दिसले. दोघांचाही हा एकमेकांविरुद्धचा शेटवचा सामना होता, अशा अटकळी लावल्या जात होत्या. मात्र, जेम्स अँडरसनने या सर्व गोष्टींवर पडदा टाकला आहे. आम्ही लवकरच पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू, असे जेम्स म्हणाला आहे.
जेम्स अँडरसन आणि विराट कोहलीचे मैदानावरील वैर जगविख्यात आहे. जेम्सने आतापर्यंत विराटला कसोटी क्रिकेटमध्ये सातवेळा बाद करण्याचा पराक्रम केलेला आहे. मात्र, ते पुन्हा एकमेकांविरोधात खेळताना दिसतील की नाही? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या कार्यक्रमामध्ये बोलताना जेम्स अँडरसनने स्वत: या प्रश्नाचे उत्तर दिले. अँडरसन म्हणाला, “आम्ही पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळताना केव्हा दिसू हे मलाही माहीत नाही. पण, विराटला गोलंदाजी करायला मला नक्की आवडेल. मी पुढच्या दौऱ्यासाठी तयार आहे. माझ्यात अद्याप भरपूर क्रिकेट बाकी आहे”.
अँडरसन सध्या ३९ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत अँडरसन किती काळ कसोटी क्रिकेटला आपली सेवा देत राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मात्र, भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपर्यंत तो इंग्लंड संघासोबत राहू शकतो, असे सांगून अँडरसनने चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा आशा निर्माण केली आहे. विराट कोहली आणि जेम्स अँडरसन यांच्यातील मैदानावरील वैर २०१४ पासून सुरू झालेले आहे. गेल्या आठ वर्षामध्ये दोघेही मैदानावर अनेकदा भिडलेले आहेत. क्रिकेट चाहत्यांनाही दोघांची मैदानावरील जुगलबंदी बघण्यात आनंद मिळतो.
ईएसपीएनच्या वृत्तानुसार, २०२४ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका आयोजित केली जाऊ शकते. म्हणजेच विराट कोहली आणि जेम्स अँडरसन यांना समोरासमोर येण्यासाठी आणखी दोन वर्षे वाट बघावी लागणार आहे.