इंग्लंडच्या फुटबॉल संघाला ‘बडा घर पोकळ वासा’ ही उक्ती अगदी साजेशी आहे. उरुग्वेविरुद्धच्या लढतीतल्या पराभवाने इंग्लंडचे आव्हान किती फुसके आहे, हे स्पष्ट झाले आहे. विश्वचषकापूर्वी जेव्हा मोठय़ा संघांची चर्चा होते, तेव्हा त्यात इंग्लंडचे नाव हमखास असते. यंदाही स्पेन, नेदरलँड्स, जर्मनी, ब्राझील यांच्या बरोबरीने इंग्लंडच्या संघाला जेतेपदाचा दावेदार मानले जात होते. मात्र कागदावर दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ प्रत्यक्षात मात्र अगदीच सामान्य दर्जाचा असल्याचे गुरुवारच्या पराभवाने सिद्ध केले आहे. लुइस सुआरेझ हा उरुग्वेचा हुकमी एक्का आहे. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत दोन गोल झळकावत त्याने उरुग्वेला शानदार विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यांचा बचावही उत्तम आहे. मात्र या सगळ्यांना भेदत सुआरेझने गोल करण्यात यश मिळवले. सातत्याने प्रदर्शनात सुधारणा करणारा चिवट संघ म्हणून उरुग्वे ओळखला जातो. २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकातही उरुग्वेने तृतीय स्थान पटकावले होते. आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ांवर उत्तम कामगिरी हे उरुग्वेचे वैशिष्टय़ आहे. गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत त्यांनी या वेळी कसून अभ्यास केल्याचे त्यांच्या खेळात दिसून आले. विश्वचषकापूर्वी बऱ्याच महिन्यांआधी त्यांचा सराव सुरू झाला होता. विश्वचषकासारख्या स्पर्धेचे गांभीर्य ओळखून त्यानुसार त्यांनी योजनाबद्घ आखणी केली होती. या शिस्तबद्ध प्रयत्नांचे फळ म्हणजे इंग्लंडविरुद्धचा विजय आहे.
उरुग्वेने १-४-३-२-१ व्यूहरचनेनुसार खेळ केला. आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही आघाडय़ा सांभाळण्यासाठी सुयोग्य अशा या समन्वयामुळेच उरुग्वेने बाजी मारली. इंग्लंडच्या संघालाही गोल करण्याच्या भरपूर संधी मिळाल्या. इंग्लंडचा प्रमुख खेळाडू वेन रूनीने गोलपोस्टपासून अगदी जवळ हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू गोलजाळ्यावर आदळून बाहेर पडला. इंग्लंडच्या संघाला विशेष करून रूनीला नशिबाची थोडी साथ मिळाली असती तर सामन्याचे चित्र पालटू शकते.
इंग्लंडच्या संघव्यवस्थापनाची भूमिकाही या निमित्ताने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंग्लंडच्या संघाला समस्यांनी ग्रासले असल्याचे स्पष्ट झाले आहे. संघात कोणत्या खेळाडूंची निवड करायची याचा अंतिम निर्णय प्रशिक्षक घेत असतो. असंख्य गुणवान खेळाडू उपलब्ध असतानाही त्यापैकी बहुतांशी खेळाडूंना विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळू शकले नाही. दुसरीकडे क्लब स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या रहीम स्टर्लिगला थेट विश्वचषकाचे तिकीट मिळाले. रहीम युवा खेळाडू आहे. त्याला राष्ट्रीय स्तरावरच्या काही स्पर्धामध्ये खेळवून नंतर संघात खेळवता आले असते. मात्र विश्वचषकासारख्या सर्वोच्च स्पर्धेत त्याला खेळवण्याचा धोका प्रशिक्षकांनी पत्करला. काही वेळेला अनुभवाची शिदोरी अवघड सामन्यांमध्ये उपयोगी पडते. यंदा इंग्लंडकडे ही शिदोरीही नव्हती.
एकहाती सामना जिंकून देऊ शकेल अशा खेळाडूची उणीव इंग्लंडला प्रकर्षांने जाणवली. अर्जेटिनाचा लिओनेल मेस्सी, ब्राझीलचा नेयमार, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो अशा पद्धतीने स्वबळावर संघाला विजयपथावर नेईल असा खेळाडूच नसल्याने इंग्लंडची पंचाईत झाली. मर्यादित गुणवत्तेच्या आणि उल्लेखनीय कामगिरी न केलेल्या खेळाडूंना मोठे करण्याचे काम इंग्लंडची प्रसारमाध्यमे करतात. मात्र प्रत्यक्ष मैदानात या खेळाडूंचे कच्चे दुवे उघड होत आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग या फुटबॉलपटूंना मालामाल करणाऱ्या क्लब दर्जाच्या स्पर्धेचे इंग्लंड हे माहेरघर. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेतूनच मोठे झाले आहेत. घरचे कार्य असल्यामुळे स्पर्धेतल्या इंग्लंडच्या खेळाडूंना मोठे करणे हे व्यावहारिकदृष्टय़ा आवश्यक असते. त्यानुसार त्यांची आणि त्यांच्या खेळाला अनाठायी प्रसिद्धी दिली जाते. प्रत्यक्षात त्यांची क्षमता मर्यादितच असते. दोन फुटबॉल क्लब्समधील पारंपरिक द्वंद्व नेहमीच चर्चेत असते. वर्षभर सातत्याने एकमेकांविरुद्ध खेळणाऱ्या या खेळाडूंना विश्वचषकाच्या निमित्ताने एकत्र खेळावे लागते. इतक्या कमी कालावधीत ते एकत्र येऊन एका संघाचे घटक होऊ शकतात का, हा खरा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा