England vs New Zealand 2nd Test: न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा शानदार पराभव करून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा १४६ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला, ज्यामध्ये यजमानांनी इंग्लिश संघाचा फक्त एका धावेनी पराभव केला. तसेच मालिकेत १-१ अशी बरोबरीत साधली.
न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु त्यांच्या दुसऱ्या डावात संपूर्ण इंग्लिश संघ २५६ धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केला, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याच वेळी, न्यूझीलंडच्या विजयाचे नायक नील वॅगनर आणि टीम साऊथी ठरले. ज्यांनी अनुक्रमे ४ आणि ३ विकेट घेतल्या.
१ धावेनी विजय मिळवणारा दुसरा संघ –
टीम साऊथीच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा १ धावेनी पराभव करून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांनी सामना जिंकणारा न्यूझीलंड हा जगातील दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी १९९३ मध्ये अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ धावेने विजय मिळवून वेस्ट इंडिजने हा विक्रम केला होता, तब्बल ३० वर्षांनंतर न्यूझीलंडने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय नोंदवून या यादीत आपले नाव नोंदवले आहे.
फॉलोऑन देऊन इंग्लंड प्रथमच कसोटी सामना हरला –
इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संघाला फॉलोऑन करून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात इंग्लंडने आपला पहिला डाव ८ विकेट गमावून ४३५ धावांवर घोषित केला. पाहुण्या संघाला येथे ५००-६०० धावा करण्याची मोठी संधी होती. कारण जो रूट १५३ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित होता. मात्र स्टोक्सच्या आक्रमक विचारसरणीमुळे इंग्लंडने आपला पहिला डाव खूप लवकर घोषित केला.
यानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव २०९ धावांत गुंडाळला गेला आणि इथे बेन स्टोक्सने दुसरी आणि सर्वात मोठी चूक केली. २२६ धावांची आघाडी घेऊन स्टोक्सने न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाज आधीच थकले होते, त्यामुळे किवी फलंदाजांनी याचा फायदा घेत दुसऱ्या डावात ४८३ धावांची मजल मारली. यादरम्यान केन विल्यमसनने १३२ धावांची शतकी खेळी केली.