सध्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अ‍ॅशेस मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या मालिकेतील पहिला सामना सध्या ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर रंगत आहे. या सामन्यात आतापर्यंत खूप काही पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. बेन स्टोक्सचा नो बॉल न देणे, डेव्हिड वॉर्नरचे नशीब, ट्रॅव्हिस हेडची फटकेबाजी आणि नंतर त्याचे झंझावाती शतक, अशा गोष्टी या मालिकेत घडल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानाबाहेर असे काही घडले, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

स्टँड्समध्ये लोकांना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया प्रेमाचे बंधन पाहायला मिळाले. एका तरुणाने सर्वांसमोर आपल्या मैत्रिणीला प्रपोज केले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी खेळ सुरू झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आणखी किती धावा जमा होणार आणि किती आघाडी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान दिवसाच्या पहिल्या सत्रात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान इंग्लंडच्या चाहत्याने ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला प्रपोज केले.

इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेल्या रॉब हेलने त्याची ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड नतालीला प्रपोज केले. सुरुवातीला नतालीला थोडा धक्का बसला, पण नंतर लगेचच तिने रॉबचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर रॉबने नतालीला उचलून आनंद व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – लय भारी..! आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा; जुन्नरच्या सुपुत्राला BCCIनं दिली सुवर्णसंधी!

२०१७ मध्ये खेळल्या गेलेल्या अ‍ॅशेस मालिकेदरम्यान रॉबची नतालीसोबत ओळख झाली. तेव्हापासून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. बार्मी आर्मीने या दोघांबद्दल ट्वीट करून ही गोष्ट सांगितली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. क्रिकेट स्टेडियममध्ये याआधीही असे प्रपोज झाले आहे. रॉब-नताली हे दोघेही वेगवेगळ्या देशांतील असल्याने या नात्यामुळे हा प्रस्ताव आणखी खास झाला आहे.

Story img Loader