आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७ बळी घेणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याला कारकीर्दीच्या दुसर्या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. अवघ्या ५ दिवसांपूर्वी रॉबिन्सनने कसोटी पदार्पण केले होते. ७-८ वर्षापूर्वी केलेल्या ट्वीटमुळे रॉबिन्सनवर ही कारवाई करण्यात आली आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने शिस्तभंगाच्या चौकशीचा निकाल लागेपर्यंत रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निलंबित केले आहे. आता तो गुरुवारपासून एजबस्टन येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीत खेळताना दिसणार नाही. रॉबिन्सन तातडीने इंग्लंडचा संघ सोडून आपल्या काऊंटी क्लब ससेक्समध्ये परत येईल, असे बोर्डाने सांगितले.
Statement: Ollie Robinson suspended from all international cricket
— England Cricket (@englandcricket) June 6, 2021
हेही वाचा – आरंभ है प्रचंड..! टीम इंडियाच्या खेळाडूंची मैदानी प्रशिक्षणाला सुरुवात
ओली रॉबिन्सनने केले होते आक्षेपार्ह ट्वीट
२०१२-२०१३मध्ये ओली रॉबिन्सनने आपल्या जुन्या ट्वीटमध्ये काही शब्दांचा वापर करून विशिष्ट धर्मातील लोकांचा दहशतवादाशी संबंध असल्याचे म्हटले होते. शिवाय, त्याने महिला आणि आशियाई वंशाच्या लोकांवरही अपमानास्पद भाष्य केले गेले होते. त्याचे हे जुने ट्वीट लॉर्ड्स कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच दिवशी व्हायरल झाले होते. या प्रकरणाबद्दल रॉबिन्सनने लगेचच माफी मागितली होती.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात रॉबिन्सनने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. यामध्ये त्याने केन विलियम्सन, रॉस टेलर, टॉम लॅथम या खेळाडूंना तंबूत धाडले होते. रॉबिन्सनने आत्तापर्यंत ६४ प्रथम श्रेणी सामने खेळताना २८६ बळी मिळवले आहेत.