प्रत्येक क्षणाला कूस बदलून उत्सुकता वाढवणाऱ्या अॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथा दिवसही नाटय़पूर्ण घटनांनी नोंदवला गेला. दिवसाच्या सुरुवातीला बेलचे शतक झाल्यावर इंग्लंड चारशे धावांचा टप्पा ओलांडेल, असे वाटत असतानाच त्यांचा डाव ३७५ धावांवर आटोपला. तर विजयासाठी ३११ धावांचे आव्हान असताना दमदार सलामीनंतरही दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची ६ बाद १७४ अशी अवस्था असल्याने ते सध्याच्या घडीला पराभवाच्या छायेत आहेत. पहिली कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला १३७ धावांची गरज असून इंग्लंड विजयापासून चार विकेट्सने दूर आहे.
शुक्रवारच्या ६ बाद २१८ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडने सावध सुरुवात केली. तळाचा फलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने अर्धशतक झळकावल्यावर धोक्याची घंटा वाजवणाऱ्या बेलने आपले शतक पूर्ण केले आणि सामन्यातील पहिले शतक झळकल्यावर स्टेडियममध्ये टाळ्यांचा एकच गजर झाला. आता इंग्लंड ऑस्ट्रेलियाला झुंजवणार असे वाटत असतानाच पॅटिन्सनने ब्रॉडला बाद करत ही जोडी फोडली. ब्रॉडने ७ चौकारांच्या जोरावर ६५ धावांची अप्रतिम खेळी साकारत इंग्लंडच्या डावाला टेकू दिला. ब्रॉड बाद झाल्यावर इंग्लंडचा संघ बिथरल्यासारखा वाटला आणि बेललाही यावेळी काहीच करता आले नाही. मोठे फटके मारण्याच्या नादात असलेल्या बेलला स्टार्कने तंबूचा रस्ता दाखवला आणि तिथेच इंग्लंडचा डाव गडगडला. बेलने बाद होण्यापूर्वी १५ चौकारांच्या जोरावर १०९ धावांची संघाच्या डावाला आकार देणारी महत्त्वपूर्ण खेळी साकारली. बेल बाद झाल्यावर अवघ्या चार धावांमध्ये इंग्लंडचा संघ ३७५ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाने गुंडाळला.
विजयासाठी ३११ लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. शेन वॉटसन (४६) आणि ख्रिस रॉजर्स यांनी ८४ धावांची दणदणीत सलामी दिली. वॉटसन बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरू शकला नाही. सलामीवीर राजर्सने ८ चौकारांच्या जोरावर ५२ धावा फटकावत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो बाद झाल्यावर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याची घाई दर्शवली. सलामीनंतर ऑस्ट्रेलियाला एकही चांगली भागीदारी रचता आली नाही आणि चौथ्या दिवसअखेर त्यांची ६ बाद १७४ अशी अवस्था झाली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : २१५
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव): २८०
इंग्लंड (दुसरा डाव) : १४९.५ षटकांत सर्व बाद ३७५ (इयान बेल १०९, स्टुअर्ट ब्रॉड ६५; मिचेल स्टार्क ३/८१)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ७१ षटकांत ६ बाद १७४ (ख्रिस रॉजर्स ५२; स्टुअर्ट ब्रॉड २/२४).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा