Highest Score in The History of Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील चौथा सामना लाहोरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. दरम्यान इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि मोठी ऐतिहासिक धावसंख्या उभारत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. बेन डकेटच्या १६५ धावा अन् जोफ्रा आर्चरत्या षटकार-चौकारांच्या जोरावर इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात ५० षटकांत ८ विकेट गमावत विक्रमी ३५१ धावा करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरूवातीला हा निर्णय योग्य ठरला. पण बेन डकेटने आणि डकेट-जो रूटच्या १५८ धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले.

फिल सॉल्टने पहिल्याच षटकात इंग्लंडला दणक्यात सुरूवात करून दिली. पण १० धावा करत बाद झाला, यानंतर जॅमी स्मिथही १५ धावा करत माघारी परतला. पण बेन डकेट आणि जो रूटने सावध क्रिकेट खेळत संघाचा डाव सावरला. बेन डकेटने उत्कृष्ट शतक झळकावले आणि त्यानंतरही त्याने आपला डाव कायम ठेवला. बेन डकेटने १४३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह १६५ धावांची विक्रमी खेळी केली. तर जो रूटने ७८ चेंडूत ४ चौकारांसह ६८ धावा केल्या. या दोघांनी १५८ धावांची कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला एकेका विकेटसाठी तंगवले.

यानंतर इंग्लंडचा कोणताच फलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. पण प्रत्येक खेळाडूने छोट्या खेळीतही चौकार-षटकार लगावत संघाची धावसंख्या पुढे नेली. अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरने २ चौकार आणि एका षटकाराह २१ धावांची खेळी करत संघाला ३५० धावांचा आकडा गाठून दिला.

ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुईसने १० षटकांत ३ विकेट्स घेतले. तर अॅडम झाम्पा आणि लबुशेनने प्रत्येकी २ विकेट घेतले. आता इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३५२ धावांचे आव्हान दिले आहे. अनेक मोठे खेळाडू संघात नसल्याचा ऑस्ट्रेलियाला फटका बसला आहे. आता कांगारू संघाचे फलंदाज कशी कामगिरी करणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

८ बाद ३५१ धावा, इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, लाहोर २०२५
४ बाद ३४७, न्यूझीलंड वि. अमेरिका, द ओव्हल २००४
४ बाद ३३८ धावा, पाकिस्तान वि. भारत, द ओव्हल २०१७
७ बाद ३३१ धावा, भारत वि. दक्षिण आफ्रिका, कार्डिफ २०१३
८ बाद ३२३ धावा, इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन २००९