England set a target of 231 runs to win against Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात २४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा करत आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने ४२० धावा केल्या आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी ऑली पोपने सर्वाधिक १९६ धावांची खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले. त्याचबरोबर भारतासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
इंग्लंडने दुसऱ्या डावात ४२० धावा केल्या. जसप्रीत बुमराहने ऑली पोपला क्लीन बोल्ड करत इंग्लंडचा डाव संपवला. पोपने २७८ चेंडूचा सामना करताना १९६ धावा केल्या, पण द्विशतक हुकले. मात्र, त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जसप्रीत बुमराह भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाने २ विकेट्स आणि अक्षर पटेलने १ विकेट्स घेतली. भारतासाठी हे लक्ष्य सोपे नसेल. सामन्याच्या चौथ्या डावात विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. आता भारत दिवसाच्या उरलेल्या दोन सत्रांमध्ये झटपट धावा करून चौथ्या दिवशीच सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंडला पहिल्या डावात २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली . इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची खेळी खेळली. तर भारतीय संघाकडून अश्विन आणि रवींद्र जडेजाने ३-३ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. इंग्लंडच्या २४६ धावांना प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ८७ धावा केल्या. केएल राहुलने ८६ धावांचे योगदान दिले. यशस्वी जैस्वालने ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात पोपच्या १९६ धावांशिवाय बेन डकेटने ४७ धावांचे, टॉम हार्टलेने ३४, बेन फॉक्सने ३४, जॅक क्रॉलीने ३१ आणि रेहान अहमदने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार आणि रविचंद्रन अश्विनने तीन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने दोन आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.