इंग्लंड क्रिकेटमध्ये सध्या अनेक बदल होताना दिसत आहेत. क्रिकेट बोर्डाच्या संचालकापासून ते कसोटी संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधारापर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अशातच आता इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इंग्लंडला २०१९ साली विश्वविजेता बनवणाऱ्या कर्णधार इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नेदरलँड्सविरुद्ध तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला होता. तर तिसऱ्या सामन्यातून त्याने कंबरेच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती.

इंग्लंडला प्रथमच विश्वविजेता बनवणाऱ्या कर्णधार इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने जोस बटलर नवीन कर्णधार होऊ शकतो. बटलरला इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मॉर्गनने गेल्या वर्षी सांगितले होते की, त्याला ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. शिवाय, २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातही सहभागी होण्याची त्याची इच्छा होती. मात्र, आपल्या सध्याच्या फॉर्मचा विचार करता त्याने निवृत्ती घेतली. ईसीबीने एका प्रसिद्धीपत्रकात त्याच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीला दुजोरा दिला आहे.

मॉर्गनच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत इंग्लंडच्या संघाने आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २०१९चा एकदिवसीय विश्वचषक त्यांनी जिंकला. भारतातील २०१६चा टी २० विश्वचषक जिंकला. शिवाय, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१च्या टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

२०१४ मध्ये मर्यादित षटकांचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. इंग्लंडचा आतापर्यंतचा क्रिकेट इतिहासातील एकदिवसीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून मॉर्गनला ओळखले जाते. २०१५ च्या विश्वचषकात बांगलादेशकडून पराभव झाल्यानंतर दृढनिश्चयी मॉर्गनने सर्व टीका स्वीकारली होती. त्यानंतर त्याने इंग्लंड क्रिकेटचे तत्कालीन संचालक अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांच्या सहकार्याने इंग्लंडला सर्वोत्तम एकदिवसीय संघात रूपांतरित केले.

इयॉन मॉर्गनने २४८ एकदिवसीय सामन्यांमध्ये सात हजार ७०१ धावा आणि ११५ टी-२० सामन्यांमध्ये दोन हजार ४५८ धावा केल्या आहेत. गेल्या सात वर्षांत इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटचा संपूर्णपणे कायापालट करण्यासाठी त्याची कारकीर्द स्मरणात राहील.

Story img Loader