दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने विंडिजचा दारूण पराभव केला आहे. विश्वविजेत्या विंडिज संघाला इंग्लंडने फक्त ४५ धावांत बाद केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या होत्या. १८३ धावांच्या आव्हाना पाठलाग करणाऱ्या विडिंज संघाने इंग्लंडच्या गोलंदाजापुढे नांगी टाकली. विडिंजचा पूर्ण संघ ११.५ षटकांत फक्त ४५ धावांत गारद झाला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने दोन षटकांत सहा धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद केले. त्याशिवाय आदिल राशिद, प्लंकेट आणि डेविड विली यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.

गेल आणि हेटमायर सारखे टी२० स्पेशालिस्ट खेळाडूही विडिंजचा लाजिरवाणा पराभव रोखू शकले नाहीत. इंग्लंडकडून सॅम बिलिंग्जने धुवांधार फलंदाजी केली तर ख्रिस जॉर्डनने ऐतिहासिक गोलंदाजी करत विडिंजला जबर धक्के दिले. बिंलिंग्ज आणि जॉर्डनच्या जोरावर इंग्लंडने दुसरा टी२० सामना १३७ धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच तीन सामन्याची टी२० मालिकेत इंग्लंड २-०ने आघाडीवर आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या.

विडिंजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय एवढा महागात पडला की त्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम झाला. सुरूवातीला इंग्लंडची पडझड झाली. फक्त ३२ धावांत इंग्लंडचे चार गडी बाद झाले होते. मात्र त्यानंतर, ज्यो रूट आणि बिलिंग्जने डाव सावरला. रूटने ४० चेंडूत ५५ धावांची खेळी केली. रूट बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या बिलिंग्जने विडिंजच्या गोलंदाजी पिसे काढली. मैदानावर चारी बाजूला षटकार आणि चौकारांची बरसात केली. बिलिंग्जने ४७ चेंडूत ८७ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि १० चौकार लगावले.