मिळालेल्या संधीचा फायदा घेत प्रतिस्पर्धी संघाच्या मानगुटीवर बसायचे आणि विजयाचा मार्ग सुकर करायचा, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाने गाब्बावरील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दाखवला. कर्णधार मायकेल क्लार्क आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या झुंजार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ४०१ धावांवर घोषित करत इंग्लंडपुढे विजयासाठी ५६१ धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची २ बाद २४ अशी अवस्था आहे. इंग्लंडला अजूनही ५३७ धावांची गरज असून ते पराभवाच्या छायेत असल्याचे म्हटले जात आहे.
तिसऱ्या दिवशी बिनबाद ६५ धावसंख्येवरून सुरुवात केल्यावर ऑस्ट्रेलियाला १० धावांमध्ये दोन फलंदाज गमवावे लागले. पण त्यानंतर मात्र वॉर्नर आणि क्लार्क यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी रचत संघाला आधार दिला. वार्नर आणि क्लार्क यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. वॉर्नरने १५४ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १२४ धावांची अप्रतिम खेळी साकारली, तर वॉर्नर बाद झाल्यावर संघाला सावरत क्लार्कने १३० चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११३ धावांची खेळी साकारली. क्लार्क बाद झाल्यावर संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत ५५ चेंडूंत ५ चौकारांसह ५३ धावांची खेळी साकारत संघाची धावसंख्या फुगवण्यात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या डावात ५६१ धावांचे डोंगराएवढय़ा विजयी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचा संघ उतरला खरा, पण दिवसअखेर २४ धावांमध्येच त्यांना दोन फलंदाज गमवावे लागले. इंग्लंडला अजूनही विजयासाठी ५३७ धावांची गरज असून त्यांच्यासाठी हे आव्हान अशक्यप्राय असल्याचे म्हटले जात आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २९५
इंग्लंड (पहिला डाव) : १३६
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ९४ षटकांत ७ बाद ४१० (डाव घोषित) ( डेव्हिड वॉर्नर १२४, मायकेल क्लार्क ११३; ख्रिस ट्रेमलेट ३/६९)
इंग्लंड (दुसरा डाव) : १५ षटकांत २ बाद २४ (अॅलिस्टर कुक खेळत आहे ११; मिचेल जॉन्सन १/७).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा