अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे दुखावलेल्या इंग्लंडला आणखी एक धक्का बसला आहे. या सामन्यातील स्लो ओव्हर रेटसाठी इंग्लंड संघाची संपूर्ण मॅच फी कापण्यात आली. यासोबतच त्यांना आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे ५ गुणही गमवावे लागले.
आयसीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी निर्धारित वेळेत पाच षटके कमी टाकल्याच्या आरोपावरून हा निर्णय दिला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ गडी राखून जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२२ (किमान ओव्हर-रेट बाबत) मध्ये दिलेल्या वेळेत एक षटक पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास खेळाडू आणि सहाय्यक संघ सदस्यांसाठी सामन्याच्या २० टक्के दंड आकारला जातो.
हेही वाचा – ASHES : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनचा विश्वविक्रम..! मलानला तंबूत धाडलं अन्…; पाहा VIDEO
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील गुणही झाले वजा!
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या कलम १६.११.२ नुसार, निर्धारित वेळेत षटक पूर्ण न केल्यास प्रत्येक षटकामागे एक गुण वजा करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, इंग्लंडच्या एकूण गुणांमधून पाच गुण वजा करण्यात आले आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल-१ भंगासाठी मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
ट्रॅव्हिस हेडने खेळाडू आणि सपोर्ट टीम सदस्यांसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अपमानास्पद भाषेच्या वापराशी संबंधित आहे. याशिवाय, त्याच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडला गेला आहे. २४ महिन्यांच्या कालावधीतील हा त्याचा पहिला गुन्हा होता. गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या ७७व्या षटकात बेन स्टोक्सच्या चेंडूवर हेडने त्याला अपशब्द वापरले.