इंग्लंडला चौथ्या दिवशीच विजयाचे वेध लागले होते. कारण ऑस्ट्रेलियापुढे ५८३ धावांचे अवघड आव्हान ठेवल्यावर इंग्लंड सामना गमावणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ होती. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचे नऊ बळी झटपट मिळवले, पण अखेरच्या जोडीने इंग्लंडला विजय लांबवला. रविवारचा विजय सोमवारी कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत लांबणार, अशी शक्यता दिसत होती. पण पंचांनी इंग्लंडला अर्धा तासाची मुदतवाढ दिली आणि या अतिरिक्त वेळेतील तीन चेंडू शिल्लक असताना इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३४७ धावांनी दणदणीत विजय साकारला. आता इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत २-० अशी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा तिसरा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. गेल्यावेळी लॉर्ड्सवर इंग्लंडने ११५ धावांनी सामना जिंकला होता, यावेळी इंग्लंडने लॉर्ड्सवर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे वस्त्रहरण केले. १८० धावांची खेळी साकारणाऱ्या जो रूटला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
इंग्लंडने ५८३ धावांचे आव्हान विजयासाठी समोर ठेवले असताना ऑस्ट्रेलियापुढे विजय हा पर्यायच उपलब्ध नव्हता. सामना अनिर्णित राहण्याचीच शक्यता होती. पण त्यांची सुरुवातच निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाच्या प्रारंभीच ३ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर उस्मान ख्वाजा (५४) आणि कर्णधार मायकेल क्लार्क (५१) यांनी चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचत पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सामना अनिर्णित राखण्याच्या दिशेने पावले टाकता आली नाहीत. या दोघांनाही रूटने तंबूची वाट दाखवत इंग्लंडला विजयासमीप नेऊन पोहोचवले. ९ बाद १९२ अशी अवस्था असताना इंग्लंडचा संघ चौथ्याच दिवशी विजय साकारेल, असे वाटत होते. पण  जेम्स पॅटिन्सन (३५) आणि रयान हॅरिस (नाबाद १६) यांनी कडवी झुंज देत इंग्लंडच्या गोलंदाजांना झगडायला लावले. निर्धारित षटके आणि वेळ संपल्यावर अर्धा तास वाढीव देण्यात आला. अखेर स्वानने हॅरिसला बाद करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडने सामन्याच्या चौथ्या दिवशी दीडशतकवीर जो रूट बाद झाल्यावर लगेगच आपला दुसरा डाव घोषित केला. रूटने रविवारी फक्त दोन धावांची आपल्या धावसंख्येत भर घातली आणि तो १८० धावांवर बाद झाला. इंग्लंडने ३४९ धावांवर दुसरा डाव घोषित केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : सर्वबाद ३६१
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : सर्वबाद १२८  
इंग्लंड (दुसरा डाव) :  ७ बाद ३४९ डाव घोषित (जो रुट नाबाद १८०, इयान बेल ७४; पीटर सिडल ३/६५)  
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ८३.२ षटकांत सर्व बाद २२६ (उस्मान ख्वाजा ५४, मायकेल क्लार्क ५१; ग्रॅमी स्वान ४/ ७८)
निकाल : इंग्लंड ३४७ धावांनी विजयी.
सामनावीर : जो रूट.
ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे पराभव
धावांनी    प्रतिस्पर्धी    स्थळ    वर्ष    
६७५     इंग्लंड    ब्रिस्बेन    १९२८
४०८    वेस्ट इंडिज    अ‍ॅडलेड    १९८०
३४७    इंग्लंड    लॉर्ड्स    २०१३

Story img Loader