न्यूझीलँडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघावर डावाने पराभव स्विकारण्याची नामुष्की ओढावली आहे. दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या जलदगती माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ तग धरु शकला नाही. ट्रेंट बोल्ट, नील वेंगर आणि टॉड अॅस्टलच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव ३२० धावांमध्ये आटोपला. दोन्ही डावांत मिळून ९ बळी घेणाऱ्या ट्रेंट बोल्टला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. एक डाव आणि ४९ धावांनी न्यूझीलँड पहिल्या कसोटी सामन्यात विजयी ठरला आहे.
इंग्लंडला पहिल्या डावात ५८ धावांमध्ये गारद केल्यानंतर न्यूझीलँडने कर्णधार केन विलियमसन आणि हेन्री निकोलस यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ४२७ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांनीही निकोलस व विलियमसनला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने ३-३ बळी मिळवले. न्यूझीलंडने उभ्या केलेल्या धावांच्या डोंगरानंतर सामना वाचवण्याची मोठी जबाबदारी इंग्लंडच्या फलंदाजांवर येऊन ठेपली होती.
पहिल्या डावाप्रमाणे सलामीवीर अॅलिस्टर कूकही अवघ्या २ धावा काढून माघारी परतला. मात्र यानंतर मार्क स्टोनमॅनने कर्णधार जो रुटच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. स्टोनमॅनने ५५ तर जो रुटने ५१ धावांची खेळी केली. नील वेंगरने स्टोनमॅनला माघारी धाडल्यानंतर बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्ट्रो, मोईन अली, ख्रिस वोक्स यांनी छोट्या छोट्या खेळी रचत संघाचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या दिवशी शेवटच्या सत्रात विजयासाठी न्यूझीलंडला ३ बळींची आवश्यकता होती. यावेळी नील वेंगरने बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्सचा बळी घेत आपल्या संघासाठी विजयाचे दरवाजे उघडे केले. अखेर अॅस्टलच्या गोलंदाजीवर जेम्स अँडरसन माघारी परतला आणि यजमान न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.