क्रिकेट हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ आहे. जगभरातील हजारो गाव-खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये क्रिकेट खेळले जाते. इंग्लंड तर क्रिकेटचे माहेरघरच आहे. तिथे प्रत्येक गावात ‘व्हिलेज क्रिकेट’ खेळले जाते. या क्रिकेटला तिथे फार महत्त्वाचे स्थान आहे. अशाच एका क्रिकेट स्पर्धेतील एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरती व्हारयल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक फलंदाज पायांना पॅड न बांधताच मैदानावरती उतरला होता.
हा व्हिडीओ साउथेंड सिविक क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या मार्टिन ह्युजेसचा आहे. इंग्लंडमधील एका गावातील क्रिकेट सामन्यादरम्यान मार्टिन फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. पण, तो पायांना पॅड बांधायचे विसरला होता. विशेष म्हणजे मैदानात येऊन फलंदाजीसाठी त्याने स्टान्सही घेतला तरी त्याच्या लक्षात आले नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मार्टिनचे पॅडकडे लक्ष वेधले. त्यानंतर मार्टिन पॅड बांधण्यासाठी डगआउटकडे धावला. हे दृश्य पाहून मैदानावर एकच हशा पिकला होता.
‘दॅट्स सो व्हिलेज’ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या मजेशीर व्हिडीओला आतापर्यंत ११ हजाराहून अधिक लाईक्स आणि १ हजार २०० रिट्विट्स मिळाले आहेत. काही ट्विटर युजर्सनीही या व्हिडीओवर अतिशय मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या सुरक्षेच्या कारणास्तव पायांना पॅड बांधणे, डोक्यावर हेल्मेट घालणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय फलंदाज मैदानावरीत येत नाही. मात्र, मार्टिन ह्युजेस पॅड बांधायचे विसरला आणि एक मजेशीर प्रसंग घडला.