लंडन : महिला क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आणि नामांकित वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी शनिवारी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आपल्या कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. त्यावेळी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन करीत झुलनला संस्मरणीय निरोप देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

लॉर्ड्सवर खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते, तसेच या मैदानावर शतक किंवा पाच गडी बाद करणे हे मोठे यश मानले जाते. फार कमी खेळाडूंना या ऐतिहासिक मैदानावर आपल्या कारकीर्दीचा अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळते. सुनील गावस्कर (आपला अखेरचा प्रथम श्रेणी सामना या मैदानावर खेळला होते), सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा किंवा ग्लेन मॅकग्रा यांसारख्या खेळाडूंनाही लॉर्ड्सवर अखेरचा सामना खेळता आला नाही. मात्र, झुलनला या मैदानावर अखेरचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.

भारताने मालिकेत यापूर्वीच २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. मात्र, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ निर्भेळ यश संपादन करण्याचा प्रयत्न करेल. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यांत सर्व विभागांत चांगली कामगिरी केली आणि आपली हीच लय कायम ठेवण्यासाठी भारताच्या खेळाडू उत्सुक आहेत. कर्णधार हरमनप्रीतने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे नाबाद ७४ आणि नाबाद १४३ धावांच्या खेळी केल्या. तिच्यासह स्मृती मानधनावर भारताच्या फलंदाजीची भिस्त आहे. सलामीवीर शफाली वर्माच्या कामगिरीची भारताला चिंता आहे. हरलीन देओलने मधल्या फळीत उत्तम कामगिरी केली आहे. गोलंदाजीत झुलनवर सर्वाचे लक्ष असेल. तिच्या निवृत्तीनंतर वेगवान गोलंदाज मेघना सिंह, रेणुका ठाकूर आणि पूजा वस्त्रकार यांना आपला खेळ आणखी उंचवावा लागेल.

* वेळ : दुपारी ३.३० वा. * थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स

विश्वचषक जिंकता न आल्याचे शल्य -झुलन

लंडन : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकता न येणे हे माझ्या दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील एकमेव शल्य असल्याचे विधान भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने शुक्रवारी केले.

शनिवारी लॉर्ड्सवर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर ३९ वर्षीय झुलन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मी आज जे काही आहे, ते केवळ क्रिकेटमुळेच आहे. मात्र, मी विश्वचषक जिंकले असते, तर अधिक आनंद झाला असता, असे झुलन म्हणाली. झुलनचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने २००५ आणि २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकाचे उपविजेतेपद मिळवले होते. मात्र, भारताला अजून एकदाही जेतेपदावर मोहोर उमटवता आलेली नाही.

‘‘मला दोन विश्वचषकांमध्ये अंतिम सामना खेळण्याची संधी मिळाली, पण आम्हाला चषकाने हुलकावणी दिली. विश्वचषक न जिंकणे, हे माझ्या कारकीर्दीतील एकमेव शल्य आहे. विश्वचषकासाठी तुम्ही चार वर्षे तयारी करता, खूप मेहनत घेता. विश्वचषक जिंकणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मात्र, माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही,’’ असे झुलनने कारकीर्दीतील अखेरच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.

‘‘माझ्या कारकीर्दीची सुरुवात झाली, त्यावेळी मी इतका दीर्घ काळ खेळू शकेन असा विचारही केला नव्हता. सामान्य घरातून आणि चकदासारख्या (पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात) लहान शहरातून असल्याने मला महिला क्रिकेटविषयी काहीच माहिती नव्हती. मला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य होते,’’ असेही झुलन म्हणाली.

Story img Loader