अॅशेस मालिका म्हणजे थरारक क्रिकेटची अनुभूती. पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सवर इंग्लंडला चारीमुंडय़ा चीत केले. तिसऱ्या कसोटीत पुनरागमनाचा वस्तुपाठ सादर करत इंग्लंडने दिमाखदार विजय मिळवला. गुरुवारपासून नॉटिंगहॅम येथे सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत विजयासह अॅशेसवर कब्जा करण्यासाठी इंग्लंडचा संघ आतुर आहे तर ही कसोटी जिंकत बरोबरीसह मालिकेतले आव्हान जिवंत राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ प्रयत्नशील आहे.
तिसऱ्या कसोटीतील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कमकुवत दुवे प्रकर्षांने समोर आले. डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स आणि स्टीव्हन स्मिथ या त्रिकुटावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची भिस्त आहे. तिन्ही कसोटीत धावांसाठी झगडणारा मायकेल क्लार्क टीकेच्या लक्ष्यस्थानी आहे. कर्णधार आणि मुख्य फलंदाज या दोन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरल्याने क्लार्कवर या कसोटीत दडपण असणार आहे. अॅडम व्होग्स मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने त्याच्या जागी शॉन मार्शला संधी मिळू शकते. तसे झाल्यास क्लार्क पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. मालिकेत चौथ्या क्रमांकावर खेळताना क्लार्कला अर्धशतकी खेळीही साकारता आलेली नाही. सहाव्या क्रमांकासाठी मिचेल मार्शची युवा ऊर्जा आणि शेन वॉटसनचा अनुभव यांच्यात चुरस आहे. यष्टीरक्षक म्हणून पीटर नेव्हिलला पसंती मिळण्याची शक्यता आहे.
फिरकीपटू नॅथन लियॉनने सातत्याने विकेट्स मिळवल्या आहेत, मात्र या कसोटीत धावांचा रतीब रोखण्यावरही त्याला भर द्यावा लागणार आहे. मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या तिघांवर वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. एजबॅस्टन कसोटीत या तिघांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. या त्रिकुटाच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचे मालिकेतील भवितव्य अवलंबून आहे.
इंग्लंडसाठी अॅलिस्टर कुक आणि अॅडम लिथ या सलामीवीरांचा फॉर्म चिंतेची बाब आहे. या दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. जो रुट आणि इयान बेल यांच्यावर इंग्लंडची भिस्त आहे. बेन स्टोक्सला अष्टपैलू चमक दाखवावी लागणार आहे. गॅरी बॅलन्सच्या जागी संधी मिळालेल्या जॉनी बेअरस्टोला संघातले स्थान सिद्ध करावे लागणार आहे. जोस बटलरने फलंदाजीतही चमक दाखवावी अशी अपेक्षा आहे. मालिकेतील दोन कसोटी विजयांमध्ये जेम्स अॅण्डरसनची भूमिका निर्णायक ठरली होती. मात्र दुखापतीमुळे अॅण्डरसन या कसोटीत खेळू शकणार नाही. अॅण्डरसनच्या जागी खेळण्यासाठी मार्क वूड आणि लायम प्लंकेट यांच्यात चुरस आहे. अॅण्डरसनच्या अनुपस्थितीत स्टुअर्ट ब्रॉड आणि स्टीव्हन फिन यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. मोइन अली इंग्लंडसाठी हुकमी एक्का आहे. खेळपट्टी स्विंगला साहाय्यकारी असल्यास इंग्लंडला फायदेशीर ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा