इंग्लंड व वेस्ट इंडिज विजयी सलामीसाठी सज्ज
ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरणारे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. वानखेडेची पाटा खेळपट्टी ही फलंदाजांना धार्जिणी असते, त्यामुळे या सामन्यातील धावांच्या वर्षांवाची अनुभूती घेण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. वेस्ट इंडिजचे बरेच खेळाडू आयपीएलमध्ये खेळले असल्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल, दुसरीकडे ही गोष्ट इंग्लंडसाठी चिंतेची बाब ठरू शकेल.
सुनील नरीन आणि किरॉन पोलार्ड हे दोन्ही मातब्बर खेळाडू विंडीजच्या संघात असले असते तर त्यांचा सामना करणे कोणत्याही संघाला कठीण गेले असते; पण तरीही ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्होसारखे अव्वल खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर कर्णधार डॅरेन सॅमी आणि आंद्रे रसेलसारखे अष्टपैलूही आहेत. पण गेल्या दोन वर्षांमध्ये फक्त आठच ट्वेन्टी-२० सामने ते खेळले आहेत, पण सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केल्यामुळे त्यांचे मनोबल कमालीचे उंचावले असेल.
इंग्लंडच्या संघात या वेळी युवा खेळाडूंचा अधिक भरणार दिसतो. मोइन अलीसारखा अष्टपैलू इंग्लंडसाठी हुकमी एक्का ठरू शकतो. कर्णधार ईऑन मॉर्गन, जो रूट, बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांच्यावर इंग्लंडची फलंदाजीची भिस्त असेल.
सामना क्र. फ५
इंग्लंड वि. वेस्ट इंडिज (गट पहिला)
संघ
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, कालरेस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसन होल्डर, इव्हिन लुइस, अॅश्ले नर्स, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, मार्लन सॅम्युअल्स, जेरॉम टेलर.
इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स व्हिन्स, अॅलेक्स हेल्स, जो रुट, मोइन अली, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, लायम प्लंकेट, रीस टॉप्ले, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, लायम डॉसन.ल्ल स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई</p>
- वेळ : सायं. ७.३० वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही मालिका गमावली असली तरी तो आता इतिहास झाला आहे. भारतामध्ये आल्यावर सारे काही आलबेल आहे. सराव सामन्यात आम्ही विजय मिळवल्यामुळे संघाचे मनोबल उंचावलेले आहे. विंडीजवर विजय मिळवत आम्ही विश्वचषकाची दिमाखात सुरुवात करण्यास उत्सुक आहोत.
– ईऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार
आमच्या संघातील सर्व खेळाडू विजयीवीर आहेत. किरॉन पोलार्ड, सुनील नरिनसारखे अव्वल खेळाडू संघात नसले तरी त्यांची जागा घेणारे खेळाडू या संघात आहेत. सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास दुणावला आहे, त्याचा या सामन्यासाठी नक्कीच फायदा होईल.
– डॅरेन सॅमी, वेस्ट इंडिजचा कर्णधार