पाकिस्तानवर ‘सुपर ओव्हर’मध्ये विजय
ट्वेन्टी-२० मालिका ३-० अशी जिंकली
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडने ‘सुपर ओव्हर’मध्ये पाकिस्तानला नमवून ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या १५४ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही १५४ धावा केल्या. त्यामुळे ‘सुपर ओव्हर’चा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ख्रिस जॉर्डनने अचूक मारा करून पाकिस्तानला अवघ्या तीन धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. हे लक्ष्य इंग्लंडने सहज पार करून विजयी चषक उंचावला.
नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय शून्यावर माघारी परतला. त्यानंतर जेम्स व्हिंस (४६) आणि जो रूट (३२) यांनी मजबूत पायाभरणी केली. त्यावर ख्रिस वोक्सने (३७) चमकदार फलंदाजी करून संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १५४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. पाकिस्तानकडून सोहेल तन्वीर (२-३६) आणि शाहिद आफ्रिदी (२-१९) यांनी यशस्वी गोलंदाजी केली.
या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डावही ३ बाद ११ असा गडगडला. त्यानंतर शोएब मलिक (७५) आणि मोहम्मद रिझवान (२४) यांनी संघाला सावरले. आफ्रिदीनेही (२९) फटकेबाजी करून सामना ७ बाद १५४ अशा बरोबरीत सोडवण्यात हातभार लावला. इंग्लंडच्या डेव्हिड विलेने (३/३६) अप्रतिम गोलंदाजी केली.