मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रयत्न इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या द्विपक्षीय ट्वेन्टी-२० मालिकेत चांगल्या कामगिरीचा असणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेन्टी-२०मध्ये चांगली कामगिरी केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याशिवाय भारताने बांगलादेशला २-१ असे नमवले आणि दक्षिण आफ्रिका तसेच, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या इंग्लंडचा संघ श्रीलंकेविरुद्धच्या पराभवाला मागे सारून नव्याने सुरुवात करेल.
हेही वाचा >>> “विराट कोहलीला मी हटवलं नाही, एवढंच म्हणालो की..” कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर सौरव गांगुलीने सोडलं मौन
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या भारताची इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावरील ट्वेन्टी-२० सामन्यातील कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे भारताचा प्रयत्न या कामगिरीत सुधारणेचा असेल. इंग्लंडविरुद्ध भारताने घरच्या मैदानांवर नऊपैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. भारताचा अखेरचा विजय मार्च २०१८मध्ये मिळाला होता. इंग्लंडविरुद्ध भारताने आतापर्यंत २७ सामन्यांपैकी सात सामन्यांत विजय नोंदवले आहेत. भारताने घरच्या मैदानांवर ५० ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी १९ सामन्यांत विजय नोंदवले, तर ३०मध्ये त्यांना पराभूत व्हावे लागले. एक सामना अनिर्णित राहिला. भारत व इंग्लंड दोन्ही संघांनी गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. पुढील स्पर्धा सप्टेंबर २०२४मध्ये आहे.
भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने या वर्षी १६ सामन्यांत १९ गडी बाद केले. तर, हरमनप्रीतने १३ ट्वेन्टी-२० सामन्यांत ३२३ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने १६ सामन्यांत ३४२ धावा केल्या. तर, स्मृती मंधानाने १५ सामन्यांत सर्वाधिक ३६९ धावा झळकावल्या. हरमनप्रीतने बिग बॅश लीगमध्ये १४ सामन्यांत ३२१ धावा केल्या. भारताने फिरकीपटू श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप आणि साइका इशाक यांना संधी दिली आहे. कश्यप या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या ‘आयसीसी’ १९ वर्षांखालील महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात सहभागी होती. तर, इशाकने पहिल्या महिल्या प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससाठी १५ गडी बाद केले. श्रेयांकाने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसाठी नऊ बळी मिळवले. इंग्लंडसाठी स्किव्ह ब्रंटने महिला प्रीमियर लीगमध्ये ३३२ धावांसह दहा गडी मिळवले.
’ वेळ : सायं. ७ वा.
’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा.