गुवाहटीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात, इंग्लंडच्या महिलांनी एका धावेने भारतीय महिला संघावर मात करत मालिकेत निर्भेळ यश संपादन केलं आहे. ३ सामन्यांची मालिका इंग्लंडच्या महिला संघाने ३-० ने जिंकली आहे. विजयासाठी १२० धावांचं माफक आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय महिलांचा संघ २० षटकात अवघ्या ११८ धावा करु शकल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडच्या महिला संघावर उलटला. चांगल्या सुरुवातीनंतर मराठमोळ्या अनुजा पाटीलने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. यानंतर इंग्लंडचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाहीय ठराविक अंतराने इंग्लंडच्या एक-एक फलंदाज माघारी परतत राहिल्या. मधल्या फळीत काही फलंदाजांनी झटपट धावा काढत संघाला तीन आकडी धावसंख्या गाठून दिली. भारताकडून अनुजा पाटील व्यतिरीक्त हरलीन देवोलने २ तर पुनम यादव आणि एकता बिश्तने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल भारतीय महिला संघाची सुरुवातही खराब झाली. हरलीन देवोल अवघी १ धाव काढून माघारी परतली. यानंतर कर्णधार स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. तिला दुसऱ्या बाजूने जेमायमा रॉड्रीग्ज आणि मिताली राजने चांगली साथ दिली. मात्र स्मृती मंधाना माघारी परतत भारतीय संघाचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. इतर फलंदाज विजयासाठी आवश्यक असलेल्या २५ धावाही पूर्ण करु शकल्या नाहीत. अखेरीस इंग्लंडच्या महिलांनी एका धावेने विजय मिळवत मालिकेत ३-० ने बाजी मारली. इंग्लंडकडून केट क्रॉसने २ तर श्रबसोल, लिन्सी स्मिथ आणि लॉरा मार्श यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.