सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. रोमांचक स्थितीत पोहचलेला हा सामना यजमान इंग्लंडने आपल्या खिश्यात घातला. माजी कर्णधार जो रूट इंग्लिश संघाच्या विजयाचा हिरो ठरला. रूटने नाबाद ११५ धावांची खेळी केली. या शतकी खेळीच्या जोरावर जो रूटने कसोटी क्रिकेटध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करून इतिहास रचला.

जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा जगातील १४वा आणि इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. रूटच्या अगोदर माजी कर्णधार आणि फलंदाज अॅलिस्टर कुकने हा पराक्रम केलेला आहे. इतकेच नाही तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीमध्ये सर्वात जलद १० हजार धावा पूर्ण करणारा रूट हा जगातील पहिला फलंदाज आहे. रूटने १० वर्षांपेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी केली.

रूटने न्यूझीलंड विरुद्ध झळकावलेले शतक हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील २६वे शतक होते. त्यामुळे रूट आता विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या सर्वाधिक कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. कोहली आणि स्मिथ दोघांच्याही नावे २७ कसोटी शतकांची नोंद आहे. नोव्हेंबर २०१९ पासून विराट कोहलीने एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेले नाही तर स्मिथने जानेवारी २०२१ पासून कसोटी क्रिकेटमध्ये तीन अंकी धावसंख्या केलेली नाही. याउलट, जो रूट सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो लवकरच कोहली आणि स्मिथचा विक्रम मोडीत काढू शकतो.

हेही वाचा – ‘मी वकार युनूसला आदर्श मानत नाही कारण…’, तुलना सुरू असताना उमरान मलिकने दिली प्रतिक्रिया

जो रूटने डिसेंबर २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारताविरुद्ध त्याने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. त्याने ११८ कसोटी सामन्यांतील २१८ डावांमध्ये ४९.५७ च्या सरासरीने १० हजार १५ धावा केल्या आहेत. २५४ ही त्याची वैयक्तीक सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये त्याने आतापर्यंत २६ शतके आणि ५६ अर्धशतके झळकावलेली आहेत.

यजमान इंग्लंडने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळाली आहे. न्यूझीलंडने २७८ धावांचे लक्ष्य दिले होते, जे इंग्लंडने चौथ्या दिवशी पाच गडी गमावून पूर्ण केले.

Story img Loader