इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये सोमवारी (२४ ऑगस्ट) परंपरागत प्रतिस्पर्धी लिव्हरपूल आणि आर्सनल यांच्यात लढत होणार आहे. रविवारी (२३ ऑगस्ट) गतविजेता चेल्सी वेस्ट ब्रॉम संघाविरुद्ध तर अव्वल स्थानी असणारा मँचेस्टर सिटी संघ एव्हर्टन विरुद्ध दोन हात करणार आहेत. शनिवारी (२२ ऑगस्ट) मँचेस्टर युनायटेडची लढत न्यूकॅसल विरुद्ध होणार आहे.
मँचेस्टर युनायटेड विरुद्ध न्यूकॅसल
सलग दोन सामने जिंकणाऱ्या युनायटेडची भिस्त मध्य फळीतील युआन मॅटा, स्ट्रायकर कप्तान वेन रूनी आणि मेम्फसीस डेपे यांच्यावर अवलंबून आहे. सिटी प्रमाणे आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यास युनायटेडचा संघ उत्सुक आहे!
युनायटेडचा फॉर्म
गोलकीपर सर्जियो रोमेरो, युआन मॅटा आणि मेम्फसीस डेपे यांचा फॉर्म युनायटेडचे प्रशिक्षक लुई फॅन गाल आणि युनायटेडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. पण वेन रुनीची निष्प्रभ कामगिरी ही एकंदर फुटबॉल प्रेमी आणि युनायटेडच्या चाहत्यांच्या चिंतेचा विषय बनू लागली आहे.
निष्प्रभ रुनी
स्ट्रायकर वेन रुनीला जणू मध्यरक्षकाची भूमिका बजावी लागत आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर तसेच गोल नोंदवण्यावर होत आहे. मध्यरक्षकाच्या भूमिका बजावत असताना स्ट्रायकर वेन रुनी निष्प्रभ ठरत आहे.
एव्हर्टन विरुद्ध मँचेस्टर सिटी
पहिल्या सामन्यात वॉटफर्ड विरुद्ध २-२ अशी बरोबरी स्विकारल्या नंतर एव्हर्टनने साउथअँम्टनवर ३-० असा सहज विजय मिळवला. त्यांच्या विजयात स्ट्रायकर्स लुकाकू आणि कून आणि मध्यफळीत प्लेमेकर रिचर्ड बार्कली यांनी चोख कामगिरी बजावली. यंदाच्या हंगामात एव्हर्टनची भिस्त या तिघांवरच जास्त अवलंबून असेल!
मँचेस्टर सिटीची भिस्त पूर्णतः फार्मात असलेले सर्जियो अ‍ॅग्वेरो, कप्तान वॅन्सॉ कम्पनी आणि याया टोरे यांच्यावर टिकून आहे. गेल्या रविवारी गतविजेत्या चेल्सीवर विजय मिळवलेल्या मँचेस्टर सिटीला सलग तिसऱ्या विजयाची प्रतीक्षा आहे. तर, आपले आव्हान टिकवण्यासाठी एव्हर्टनला हा सामना किमान बरोबरीत सोडवण्याची गरज आहे!
चेल्सीची रडतखडत सुरुवात!
गतविजेता चेल्सी संघाची यंदाच्या हंगामाची सुरुवात फारच खराब झाली आहे. सर्वप्रथम फुटबॉल असोसिएशन चषक विजेत्या आर्सनलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या विजेत्या चेल्सीचा पराभव करून कम्युनिटी शिल्डचे जेतेपद पटकावले. त्यानंतर गतविजेता चेल्सी संघाला पहिल्याच सामन्यात स्वान्सी विरुद्ध २-२ अशी बरोबरी स्विकारावी लागली. इजा, बिजा, तिजा होतं मागच्या रविवारी मँचेस्टर सिटीने त्यांना ३-० असे नमवले.
पेड्रोचे आगमन
बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या पेड्रोच्या चेल्सी येथील आगमनाने प्रशिक्षक जोसे मरिनो आणि चेल्सी सुखावले आहेत. काहीशी रडतखडत सुरुवात करणाऱ्या चेल्सी संघाच्या मधल्या फळीस पेड्रो चांगलीच बळकटी देऊ शकेल, अशी आशा आहे.
हंगामातील पहिल्या विजयासाठी चेल्सीचा संघ उत्सुक
फुटबॉल पंडितांच्या मते उत्कृष्ट स्ट्रायकरची उणीव चेल्सी संघाला चांगलीच भासत आहे. तसेच गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या संघाची बचावफळी फारचं ढिली वाटतं आहे. आपलं जेतेपदं राखण्यासाठी त्यांना लवकरच या त्रुटींवर मात करावी लागेल. पराभवाचे शल्य विसरून वेस्ट ब्रॉम संघाविरुद्ध यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयासाठी चेल्सीचा संघ उत्सुक आहे!
आर्सनल विरुद्ध लिव्हरपूल
यंदाच्या हंगामात लिव्हरपूल आणि आर्सनल या दोन्ही संघांना अद्याप म्हणावा तसा सूर गवसलेला नाही. तसेच एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या उभयतांमधील १५ सामन्यांमध्ये केवळ दोनदाच लिव्हरपूलला आर्सनल संघावर विजय मिळवता आला आहे.
यंदाच्या हंगामात आर्सनल संघ आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व मिळवण्यात अपयशी ठरत आहे. तसेच त्यांना चेंडूवर ताबाही अधिक काळ टिकवता आलेला नाही. प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण रोखण्यात बचावफळीची बरीच तारांबळ उडत आहे. मध्यफळीत प्लेमेकर आणि उत्कृष्ट स्ट्रायकरची उणीव आर्सनल संघाला चांगलीच भासत आहे. या सर्व बाबी प्रशिक्षक आर्सेन वेंगर यांची डोकेदुखी बनल्या आहेत.
मध्यफळीतील ओझील, कॅझोरला, अ‍ॅरन रॅमझी आणि स्ट्रायकर अ‍ॅलेक्स सँचेझ यांचा फॉर्म हीच केवळ आर्सनलच्या जमेची बाजू आहे. फुटबॉल पंडितांच्यामते आर्सनलच्या मध्यफळी विरुद्ध लिव्हरपूलची बचावफळी अशी एक आक्रमक आणि चुरशीची लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल. आर्सनल संघाचे पारडे जड असलेली ही लढत बरोबरीत सुटेल असा अंदाज ते व्यक्त करीत आहेत!
– केदार लेले (लंडन)

Story img Loader