इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेतील अर्सेनल आणि चेल्सी यांच्यातील मुकाबला म्हणजे दर्जेदार आणि थरारक खेळाची पर्वणी असते, मात्र सोमवारी या दोन संघांतील लढत नीरस होऊन अखेर गोलशून्य बरोबरीत संपली. आपल्या संघाच्या समर्थनासाठी उपस्थित राहिलेल्या हजारो चाहत्यांची या बरोबरीने निराशा झाली. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने मनासारखा खेळ पाहण्याचे सुख त्यांना लाभले नाही. ही लढत बरोबरीत सुटल्याने अर्सेनेलला गुणतालिकेत अव्वल स्थान गाठता आले नाही.
‘‘चेल्सीने चांगला बचाव केला. संपूर्ण सामन्यात त्यांनी सुसूत्र पद्धतीने खेळ केला. त्यांच्या बचावपटूंना भेदत गोल करणे आमच्या खेळाडूंना जमले नाही,’’ असे अर्सेनेलचे व्यवस्थापक वेगनर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘मँचेस्टर सिटीविरुद्धचा मोठा पराभव खेळाडूंच्या डोक्यात होता. या पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांच्याकडून बचावात्मक खेळ झाला. दुसऱ्या सत्रात चेंडूवर आम्ही बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले. दोन ते तीन वेळा गोल करण्याची संधी होती, मात्र आम्ही त्यात अपयशी ठरलो.’’
चेल्सीतर्फे फ्रँक लॅम्पर्डचा गोल करण्याच्या प्रयत्नात चेंडू क्रॉसबारवर जाऊन आदळला, तर अर्सेनेलकडून पीटर सेकचा गोल गोलपोस्टच्या बाजूने गेल्याने ही लढत गोलशून्य बरोबरीत संपली.
गुणतालिकेत अर्सेनेल दुसऱ्या स्थानी आहे तर चेल्सीचा संघ चौथ्या स्थानी आहे.

Story img Loader