जॉन ऑबी मायकेलने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये झळकावलेल्या पहिल्यावहिल्या गोलच्या बळावर चेल्सीने विजयपथावर मार्गक्रमण केले. ईपीएलमधील या सामन्यात चेल्सीने फुलहॅमवर २-० असा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. युरोपियन सुपर लीगच्या अंतिम फेरीत चेल्सीला बायर्न म्युनिककडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर चेल्सी संघ एव्हरटन आणि बसेलकडून पराभूत झाला होता. पण या सामन्यात चेल्सीने जोमाने पुनरागमन केले. दुसऱ्या सत्रात ऑस्करने चेल्सीचे खाते खोलल्यानंतर जॉन ऑबी मायकेलने गोलक्षेत्रातून मारलेला फटका गोलजाळ्यात गेला. ८४व्या मिनिटाला केलेल्या या गोलमुळे चेल्सीने आरामात विजय मिळवला.

Story img Loader