इंग्लिश प्रीमिअर लीगच्या जेतेपदासाठी सध्या जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात एकमेकांना खाली खेचून अव्वल स्थानी मुसंडी मारण्याची जणू स्पर्धाच रंगली आहे. लिव्हरपूलने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात बलाढय़ टॉटनहॅम हॉट्सपरचा ४-० असा दणदणीत पराभव करून डिसेंबरनंतर प्रथमच अव्वल स्थानी झेप घेतली.
चेल्सी, मँचेस्टर सिटी आणि अर्सेनल यांना शनिवारी बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर लिव्हरपूलने याचा पुरेपूर फायदा उठवला. टॉटनहॅमवरील विजयासह तीन गुणांची कमाई करत लिव्हरपूलने १९९०नंतर प्रथमच जेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केली आहे. दुसऱ्याच मिनिटाला टॉटनहॅमचा कर्णधार यौनेस काबूल याने स्वयंगोल करत लिव्हरपूलचे खाते खोलले. त्यानंतर ब्रेंडन रॉजर्स यांच्या प्रशिक्षकपदाखालील लिव्हरपूलने मागे वळून पाहिले नाही. गोलचा धडाका लावत लिव्हरपूलने सामन्यावर वर्चस्व गाजवले.
स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या लुईस सुआरेझने २५व्या मिनिटाला दुसरा गोल लगावला. त्याचा हा या मोसमातील २९वा गोल ठरला. त्यानंतर फिलिप कुटिन्होने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला तिसऱ्या गोलाची भर घातली. जॉर्डन हेन्डरसन याने सामना संपायला १५ मिनिटे शिल्लक असताना चौथा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर मोहोर उमटवली. लिव्हरपूलचा हा इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सलग आठवा विजय ठरला.
दुसऱ्या सामन्यात एव्हरटनने फुलहॅमचा ३-१ असा पराभव करत गुणतालिकेत पाचवे स्थान कायम राखले आहे. एव्हरटनच्या विजयात डेव्हिड स्टॉकडेल (५०व्या मिनिटाला स्वयंगोल), केव्हिन मिराल्लास (७९व्या मिनिटाला) आणि स्टीव्हन नायस्मिथ (८७व्या मिनिटाला) यांनी मोलाची भूमिका बजावली. फुलहॅमकडून अश्कान देजागाह (७१व्या मिनिटाला) याने एकमेव गोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा