नवनियुक्त प्रशिक्षक मॅन्यूएल पॅलेग्रिनी यांच्या मँचेस्टर सिटी संघाने सलामीच्या सामन्यात न्यूकॅसलचा ४-० असा धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये शानदार सुरुवात केली आहे. नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर युनायटेड आणि चेल्सी या प्रतिस्पर्धी संघांनी विजय नोंदवले असले तरी मँचेस्टर सिटीने दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
स्पेनचा मध्यरक्षक डेव्हिड सिल्व्हाने सहाव्या मिनिटाला हेडरद्वारे सुरेख गोल करून सिटीला १-० असे आघाडीवर आणले. त्यानंतर अर्जेटिनाचा आघाडीवर सर्जीओ अ‍ॅग्युरो याने एडिन झेकोच्या मदतीने २२व्या मिनिटाला गोल करत सिटीची आघाडी भक्कम केली. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याच्या काही सेकंदआधी अ‍ॅग्युरोला कोपर मारल्याप्रकरणी न्यूकॅसलचा बचावपटू स्टीव्हन टेलरचा पंचांनी लाल कार्ड दाखवून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे न्यूकॅसलला दुसऱ्या सत्रात १० जणांसह खेळावे लागले. याचा फायदा उठवत दुसऱ्या सत्रात मँचेस्टर सिटीने दोन गोलांची भर घातली. ५०व्या मिनिटाला याया टौरेने फ्री-किकवर तिसरा गोल लगावला. त्यानंतर समीर नास्री याने आणखी एक गोल करत सिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीत एसी मिलान संघाने पीएसडब्ल्यू संघाविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. स्टीफन अल शारावीने १५व्या मिनिटाला गोल करून एसी मिलानला आघाडी मिळवून दिली होती. मात्र मिलानचा गोलरक्षक ख्रिस्तियान अबियातीच्या चुकीमुळे टिम माटावझ याने गोल करून सामना बरोबरीत सोडवला. त्याआधीच्या सामन्यात रिअल सोसिएदादने लिऑनवर २-० अशी मात केली होती.

Story img Loader